अभिनेता प्रशांत दामले यांचे परखड मत

नागपूर : नाटक हा एक व्यवसाय आहे. या व्यवसायाची मांडणी तुम्हाला जमली नाही, तर ते तुमचे अपयश आहे. त्याचे खापर शासनावर फोडून शासनाकडून मदतीची अपेक्षा का करायची, असा टोला अभिनेता प्रशांत दामले यांनी सरकारकडे मदतीसाठी हात पसरणाऱ्यांना हाणला. व्यवसायाची भट्टी चुकू शकते आणि ते अपयश पचवण्याची तुमची तयारी असली पाहिजे, असे परखड मत त्यांनी मांडले.

एसजीआर नॉलेज फाउंडेशनच्या वतीने आणि चिटणवीस सेंटरच्या सहकार्याने आयोजित ‘गप्पा, गोष्टी आणि गाणे’या कार्यक्रमात अभिनेता प्रशांत दामले यांनी सडेतोड मते मांडली. नाटक ही गोष्ट सामान्य माणूस आणि शासनासाठी शेवटच्या क्रमांकावर आहे. कारण प्रत्येकाच्या घरी मोठा टीव्ही आहे. अशावेळी घरातल्या या रसिकाला बाहेर काढण्याचे कसब आम्हाला जमले पाहिजे. हे कसब जमले तर नाटक नावाच्या व्यवसायाला मंदी येणार नाही आणि प्रेक्षकांपुढे हात पसरण्याची गरज राहणार नाही, असे दामले यांनी सांगितले. पुरस्कार, पुरस्कार समित्या, परिक्षक यावर अनपेक्षितपणे त्यांनी टीका केली आणि त्याचवेळी मी कोणत्याही गटात नाही, असेही सांगितले.

मराठी वाहिन्यांची संख्या वाढत चाललीय, पण यापैकी एकाही वाहिनीवर स्वच्छ मराठी बोलली जात नाही. एकदाचा अभिनय येत नसेल तर चालेल, पण स्वच्छ मराठी बोलता येणे महत्त्वाचे आहे. नाटक समांतर आहे, प्रायोगिक आहे की व्यावसायिक आहे यापेक्षा नाटक चांगले होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आठवीत असताना नाटय़प्रवासाला सुरुवात

आठवीत असताना पहिल्यांदा ‘मेरे नैना सावन भादो.’ हे गाणे गायलो आणि मास्तराने मग मला गाण्यासाठी पकडूनच ठेवले. दहावीत असताना ‘रंजिशी सही, दिल ही दुखाने के लिए आज.’ आणि ‘सरकती जाए है, रुख से नकाब..’या दोन गझल गायल्या. सांगितिक नाटकाचा प्रवास कदाचित त्यातूनच सुरू झाला असावा. यावेळी रसिकप्रेक्षकांसमोर त्यांनी हे गाणे आणि गझल तेवढ्याच ताकदीने सादर केल्या.