लोकसत्ता टीम वर्धा : भारतीय संस्कृतीत सणावारास विशेष महत्व आहे. त्यात नागपंचमी श्रध्येने साजरी केल्या जाते. त्यामागे प्राणीमात्रंवार प्रेम करा, सापाच्या उपकारांची जाणीव ठेवा, त्यांची हत्या टाळा असे उद्देश असतात. पण गैरसमजातून ते होत नाही. पौराणिक साहित्य तसेच आधुनिक चित्रपट, साहित्य यातून सापाबाबत लोकरंजन करीत सापाविषयी अंधश्रद्धा व भीती बळकट केली असल्याची खंत पशु अनाथालय असलेल्या 'करुणाश्रम' चे संचालक आशिष गोस्वामी व्यक्त करतात. साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने त्याची हत्या टाळावी म्हणून वन्यजीव कायद्याने त्यास संरक्षण मिळाले आहे. साप उंदिराच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. जेव्हा एक बिनविषारी धामण साप मारल्या जातो तेव्हा एक लाख उंदीरांना जीवदान मिळते. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पन्नापैकी २६ टक्के धान्याची हानी उंदीर करीत असतात. सापाच्या विषचा उपयोग जीवनदायी औषधे तयार करण्यासाठी तसेच कॅन्सर वैगेरे सारख्या व्याधी उपचारात ते कामात येते. साप आपणास वाचवितो म्हणून आपणही त्याला वाचविले पाहिजे. सापाचा मेंदू अविकसित असतो, त्यास स्मरणशक्ती तसेच हात, पाय, पापण्या, केस व कान हे अवयव नसतात. साप पाळीव प्राण्यासारखा माणसाळत नाही. आणखी वाचा-गडचिरोलीत जागा वाटपाआधीच आघाडी, युतीत कुरघोड्या! भारतात २६२ जातींचे साप असून त्यात १५ टक्के विषारी व ८५ टक्के बिनविषारी आहेत. महाराष्ट्रात आढळणाऱ्या ५२ पैकी १२ विषारी तर ४० बिनविषारी आहेत. घोणस, फुरके, नाग व मन्यार हे प्रमुख विषारी साप आहेत. दंश केल्यास विष कोणत्याही मंत्राने उतरत नाही. म्हणून घरगुती उपचारात वेळ वाया नं घालविता रुग्णालयात नेणे उचित.साप दूध पीत नाही, डुख धरत नाही, बदला घेत नाही, स्वतः नाहक चावत नाही किंवा हल्ला करीत नाही. म्हणून विषारी साप आसपास असल्यास शांत रहावे. हालचाल करू नये. कारण साप फक्त हालचाली पाहून हल्ला करतो. शक्य तितक्या लवकर दूर व्हावे. साप दिसल्यास दुरवरून त्याच्यावर ओले कापड टाकावे. त्यास अंधार व ओलावा आवडतो. तितक्या वेळेत सर्पमित्रास बोलवावे. या चार प्रमुख विषारी सापाखेरीज हरणटोळ, मांजऱ्या, पापडा, हिरवा घोणस, श्वानमुखी, पानदिवड हे अर्धविषारी साप आहेत. सर्व समुद्री साप विषारी असतात. अर्धविषारी सापाचा दंश झाल्यास मृत्यूचा धोका नसतो. पण त्वरित उपचार करुन घ्यावे, असा सल्ला पिपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेचे प्रमुख असलेले आशिष गोस्वामी देतात. सापाला कधीच मारू नये, असे ते सुचवितात.