भंडारा : लाखनी तालुक्यातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टरचे एका तरुणी सोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ परिसरातील काही नागरिकांनी शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
लाखनी तालुक्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणी वाढता रोष पाहून जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता दबाव आणि सामाजिक तणावामुळे ही कारवाई करण्यात आली असून प्रकरण अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.
लाखनी तालुक्यातील एका डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य केले आहे. मुरमाडी (तुपकर) परिसरातील आरोग्य केंद्राशी संबंधित या व्हिडीओमध्ये एक अधिकारी निर्जन ठिकाणी तरुणी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला. काही नागरिकांनी त्यांच्या या गैरवर्तनाचा व्हिडिओ बनवला. नागरिकांनी या दोघांना रंगेहात पकडल्यानंतर दोघांनीही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे गैरकृत्य कसे करू शकता असा प्रश्न उपस्थित करत त्यांना रोखून धरले. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर व जिल्हाधिकारी सावन कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात दोषी अधिकाऱ्याला सेवेतून तत्काळ निष्कासित करण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी या आरोग्य विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंचायत समिती सदस्य रवींद्र खोब्रागडे यांनी गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आरोग्य केंद्रावर कुलूपबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. गावकऱ्यांच्या मते अशा प्रकारची कृत्ये समाजातील नैतिक मूल्यांवर घाला घालतात आणि तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम करतात. दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घालणा-यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.नव नियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी दिले निवेदन
प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी येथे कार्यरत असलेले डॉक्टर यांनी अत्यंत अश्लील, घृणास्पद व समाजविघातक असे कृत्य केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे केवळ डॉक्टर या व्यवसायाचा अपमान झालेला नाही, तर संपूर्ण समाजात संताप व अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य डॉक्टर ही समाजातील एक आदर्श आणि पवित्र अशी भूमिका मानली जाते. मात्र अशा वर्तनामुळे ग्रामस्थांचा विश्वास डळमळीत झाला आहे. गावातील महिला, मुले, तरुण व वृद्ध यांच्यावर मानसिक परिणाम होऊन असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे, आमच्या ग्रामपंचायतीत, पी.एस.सी. मध्ये किंवा जिल्हा परिषद क्षेत्रात अशा व्यक्तीला कोणत्याही स्वरूपात स्थान देऊ नये, तसेच संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निष्काषित करावे ही आमची सर्व ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. आपण या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून गावातील शांतता, सुरक्षितता व सामाजिक शिस्त अबाधित ठेवावी ही अशा मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.