नागपूर : ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने राज्यभरात ४५ हजार ५०० प्रतिबंधात्मक लसींचे वितरण केले. परंतु करोनानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही लसीबाबत भीती असल्याने ते लस घेण्यात टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

राज्यात स्वाईन फ्लू संवर्गातील ‘इनफ्लुएंझा ए एच१ एन १’, ‘इनफ्लुएंझा एच३ एन२’ अशा उपप्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यात स्वाईन फ्लूचे एकूण २ हजार ३२५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही संक्रमण होऊ शकते. त्यामुळे शासनाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांसह अतिजोखमीतील व्यक्ती, वृद्ध, गरोदर माता, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस नि:शुल्क दिली जाते. राज्यातील पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर या आरोग्य मंडळात २०२४ मध्ये शासनाकडून ४५ हजार ५०० प्रतिबंधात्मक लसींचे वितरण केले गेले. परंतु प्रत्यक्षात केवळ २ हजार ६०८ जणांनीच लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस घेण्यात अतिजोखमीतील नागरिकांसोबतच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही फारसा रस दिसत नाही.

हेही वाचा >>>थंडीचा कडाका आणखी वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा

लस न लावण्याचे इतर कारणे…

स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस ही टोचून घेणारी आणि नाकाद्वारे घेतल्या जाणारी अशा दोन स्वरूपात येते. आरोग्य विभागाकडून केवळ टोचून घेणारीच लस उपलब्ध केली जाते. ही लस प्रत्येक वर्षी घ्यावी लागले. त्यामुळे प्रत्येक वर्षी टोचून लस घेण्यास आरोग्य कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचेही काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे शासनाने नाकाद्वारे घेतल्या जाणारी नोझल स्वरूपातील लस दिल्यास त्याला तुलनेत चांगला प्रतिसाद मिळण्याची आशाही या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहे.

“जगभरातील करोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आल्यावर अनेकांनी ती घेतली. परंतु काही लसींपासून मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचे पुढे आल्याने काही डॉक्टरांमध्ये स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत भीतीचे वातावरण आहे. परंतु ही लस सुरक्षित आहे.” – डॉ. सजल बंसल, माजी राष्ट्रीय महासचिव, फेमा डॉक्टर्स असोसिएशन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वाईन फ्लूचा (इनफ्लूएन्झा) उद्रेक प्रत्येक एक- दोन वर्षात एकदा होत असतो. त्यामुळे शासन अतिजोखमेतील व्यक्ती व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस नि:शुल्क उपलब्ध करते. त्यामुळे संबंधितांनी ही लस घ्यावी. ती सुरक्षित आहे.” – डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा, पुणे.