भंडारा : एक व्यक्ती एअर गनने गोळ्या झाडून एका बेवारस कुत्र्याला अमानुषपणे ठार करीत असल्याचा एक व्हिडीओ सध्या माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील निर्दयी व्यक्तीने क्रूरतेचा कळस गाठला असून या घटनेमुळे प्राणी प्रेमींमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. हा खळबळजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गोबरवाहीचे पोलीस ठाण्याचे ठाणेदार शरद शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सूड भावनेतून घडला आहे. २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास चिखला माइन्स येथील दुर्गा चौकात एका कुत्र्यावर एअर गनने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी एका तरुणाच्या तक्रारीवरून आरोपी आरिफ सलाम शेख (४५, रा. चिखला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चिखला गावातील दुर्गा चौकात रामायणाचा कार्यक्रम संपल्यानंतर राहुल आणि त्याचे मित्र घरी परतत होते. त्यावेळी शेजारी राहणारा आरिफ राहुलच्या कुत्र्यावर एअर गनने हल्ला करताना दिसला. राहुलने त्याला कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, कुत्र्याने त्याच्या शेतातल्या ४० कोंबड्या मारल्या आहेत. त्यामुळे त्याने कुत्र्याला मारले.

या घटनेबाबत राहुलने २३ जून रोजी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी आरिफ सलाम शेखविरुद्ध कलम ३२५ भारतीय न्याय संहिता २०२३ उपकलम ११ (एल) प्राणी प्रतिबंध कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृत कुत्र्याचे अंत्यसंस्कार करून त्याचे दहन करण्यात आले.

एखाद्या मुक्या प्राण्याला इतक्या निर्दयीपणे मारणे हे माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. जर कुत्र्यामुळे आरोपीचे नुकसान झाले असेल तर त्याने तशी तक्रार करायला हवी होती. कायदेशीर मार्गाने जाऊन नुकसान भरपाईची मागणी करायला हवी होती. त्याने केलेले कृत्य शिक्षेस पात्र आहे. – सुरेखा माहुले, प्राणी प्रेमी, भंडारा.