श्वानांच्या हैदोसाने त्रासलेली महापालिका कारवाई करणार
नागपूर : शहरातील मोकाट श्वानांच्या हैदोसाने त्रासलेल्या महापालिकेने आता एक कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे एका घरी दोनपेक्षा अधिक श्वान असू नये, असा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की दोनपेक्षा अधिक श्वान पाळणाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.
वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट श्वानांच्या टोळ्या बसलेल्या असतात. ते वाहनांच्या, तसेच लहान मुलांच्या मागे धावतात. मागील दोन महिन्यात मोकाट श्वानांच्या दंशाच्या २२ घटना घडल्या. दुसरीकडे अनेक उच्चभ्रू वस्तीसह इतरही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून किंवा हौस म्हणून घरी श्वान पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेकांकडे दोनपेक्षा जास्त पाळीव श्वान असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळीव श्वानांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार एका घरी दोनपेक्षा अधिक श्वान असू नये, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. दोन पेक्षा अधिक पाळीव श्वान असतील तर त्याच्या मालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे.
मोकाट श्वानांच्या नसबंदीचा दावा
२००६ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने २००६ ते २०१२ पर्यंत ५८ हजार ८४३ मोकाट श्वानांवर नसबंदी केली. त्यानंतर पुढील दीड वर्षे ही मोहीम थंड होती. त्यानंतर जुलै २०१४-२०१५ दरम्यान ११ हजार ९३ , २०१६ ते २०१८ या काळात ८ हजार २०० व २०१९ ते जानेवारी २०२० ३ हजार २०० श्वानांवर नसबंदी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.