देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमांना आवाहन

नागपूर : पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी किंवा बैठकींसाठी दिल्लीला जावे लागते. त्यामुळे माझ्या दिल्लीवारीचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नका, असे आवाहन  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना  केले.

शनिवारी सकाळी दिल्लीहून नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात जे नवीन मंत्री झाले त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. केंद्र सरकारकडे आपली विविध कामे असतात. त्यासाठी अधूनमधून जावे लागते. त्यामुळे या दिल्ली भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याचे काहीच कारण नाही. मी महाराष्ट्रातच राहणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत  मनसेशी युती करणार का  या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, निवडणुकीला वेळ आहे. राज ठाकरेंबाबत नकार नाही, पण  योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य नीट समजून घेतले पाहिजे. त्यांना जे म्हणायचे आहे ते अर्धवटच समजून घेतले आहे असेही फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा विषयाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. छगन भूजबळ यांच्याशी त्याबाबत चर्चा झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा अधिकार राज्यालाच आहे केंद्राला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी महापालिका निवडणुका बघता पदाधिकाऱ्यांनी नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करावे, त्यांच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, बुथ पातळीवर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केले.  शनिवारी दुपारी  फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेत शहरातील आगामी महापालिका निवडणुका व  शहरात सुरू असलेल्या  विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला. या  बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह कोअर कमिटीचे पदाधिकारी व सर्व विधानसभा निहाय अध्यक्ष उपस्थित होते.