डॉ. वेदप्रकाश मिश्रांची कुलगुरूंवर अप्रत्यक्ष टीका

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे आणि कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. औचित्य होते स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या बावीसाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी भाषणातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांच्यावर त्यांचे नाव न घेताटीका केली. याआधी विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांचे मोर्चे येत होते. परंतु, कधीही दोन कोटींची सुरक्षा व्यवस्था लावण्याची गरज पडली नाही. मात्र, ज्यांना काही लपवायचे असते त्यांना अशा सुरक्षेची गरज भासते. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पाठीराख्यांपासून कायम सावध राहा, असे  मिश्रा म्हणाले.

डॉ. काणे हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यावर डॉ. मिश्रा आणि त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच विद्यापीठाच्या विविध समित्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना डॉ. मिश्रांची उपस्थिती ही अगत्याची असायचीच. याच काळात डॉ. काणेंनी मिश्रांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार देऊनही सन्मान केला. मात्र, विद्यापीठाच्या अंतर्गत राजकारणामुळे पुढे डॉ. काणे आणि डॉ. मिश्रा यांच्यातील नात्याला तडा गेला. तो पुढे इतक्या टोकाला गेला की, कुलगुरू काणे यांनी डॉ. वेदप्रकाश मिश्रांचे २७ वर्षे जुने गांधी विचारधारा विषयातील अवैध पदविकेचे प्रकरण बाहेर काढले. या प्रकरणाला त्यांनी शेवटास नेण्याचा जणू अट्टाहास घेतला आणि अखेर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. मिश्रा यांनी चौर्यकर्म सिद्ध करीत पदविका परत घेतली. ही गोष्ट मिश्रांनाही सहन होणारी नव्हतीच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी स्व. दादासाहेब काळमेघांच्या पुण्यतिथीनिमित्त मिश्रांना काणेंचा वचपा काढण्याची संधी मिळाली व त्यांनी कुलगुरू काणेंवर अप्रत्यक्ष जोरदार फटकेबाजी केली. १९८१ मध्ये अमरावतीवरून एक विद्यार्थी आपल्या प्राचार्य वडिलांचे पत्र घेऊन तत्कालीन कुलगुरू डॉ. दादासाहेब काळमेघ यांना भेटला होता. एम.एस्सी. सांख्यिकीला प्रवेश घेताना किंग अडव्हर्ड मेमोरियल ट्रस्टची शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विनवणी केली व ती दादासाहेबांनी मान्यही केली. मात्र, तेच आज कुलगुरू झाल्यावर दादासाहेबांचे हे उपकार विसरले आहेत अशी टीकाही डॉ. मिश्रांनी केली. याला एक सांगा, त्याला एक सांगा, याला हाताशी घ्या, त्याला दूर करा असे करून स्वत: हित करून घेण्याचे काम दादासाहेबांनी कधीही केले नाही. मात्र, आज विद्यापीठामध्ये तसेच चित्र असल्याचा आरोपही डॉ. मिश्रा यांनी केला.