अमरावती : जगातील वाढत्या कार्बन उत्सर्जनाशी लढण्यासाठी सौर पॅनलकडे एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहिले जाते. पण, त्यावर पडणारी सावली हा सर्वात मोठा शत्रू आहे. एखा‌द्या झाडाची फांदी, इमारतीची सावली किंवा तारेची रेषा सावली जरी सौर पॅनलवर पडली तरी वीज निर्मिती जवळपास थांबते आणि सौर यंत्रणेला आग लागण्याची शक्यता असते. अमरावतीचे ‘पेटंट मॅन’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय इंगोले यांच्या नवीन संशोधनामुळे या समस्या कायमच्या मिटल्या आहेत.

अंतर्गत रचना बदलणारी सावली प्रतिबंधक सौर पध्दत आता या नवीन पेटंटव्दारे अधिकृत झाली आहे. ज्यामुळे सौर उर्जा यंत्रणेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढते आणि खर्चात बचतही होते. ही तांत्रिक प्रगती विशेषतः शहरी छपरावरील सौर प्रकल्पा पासून ग्रामीण विद्युतीकरणापर्यंत सर्वत्र उपयुक्त ठरणार आहे. सौर पॅनलवर पडणाऱ्या सावलीमुळे होणारी वीज निर्मितीतील घट रोखण्यासाठी विकसित केलेल्या अभिनव तंत्रज्ञानाचे पेटंट संशोधक डॉ. इंगोले यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

डॉ. विजय इंगोले यांचे हे नवीन पेटंट राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे डॉ. इंगोले यांनी आतापर्यंत ३९ पेटंट दाखल केली आहेत. सौर तंत्रज्ञान, विद्युत उपकरणे, यांत्रिक इंजिन डिझाईन (क्वांटम कॉम्प्युटिंग) या क्षेत्रात त्यांनी अनेक मौलिक संकल्पना विकसित केल्या आहेत. ग्रीन सर्कल या त्यांच्या संशोधन केंद्रात त्यांचे संशोधनाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. अमरावती सारख्या शहरातूनही जागतिक उर्जा क्षेत्राला नवा मार्ग दाखविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीकरणीय उर्जेच्या वापराचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे भारताकडे थार वाळवंटासारखी प्रचंड सौर क्षमता आहे. तेथे उभारलेल्या मोठ्या प्रकल्पांतून देशाच्या बहुतांश वीज गरजा भागू शकतात आणि ती प्रत्यक्षात आली तर या नवीन संशोधनाचा अत्यंत फायदा होईल.

सौर उर्जा सर्वासाठी अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि परवडणारी करणे हा आहे. जेणेकरुन भारतासारख्या देशात नवीकरणीय उर्जेचा खरा क्रांतीकारी वापर होईल हा नवीन संशोधनाचा उ‌द्देश असल्याचे डॉ. विजय इंगोले यांनी सांगितले. भविष्यात अशा तंत्रज्ञानाच्या आधारे भारत फक्त उर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणार नाही तर जागतिक पातळीवर उर्जेचा पुरवठादारही बनू शकेल. नवीन कल्पना कोणत्याही कोपऱ्यातून जन्म घेवू शकते, फक्त तिला जपणे आणि ते सिध्द करुन दाखविणे अत्यावश्यक आहे, असेही संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी सांगितले.