अधिकृत पावसाळी पर्यटन पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा धोकादायक ठरत असतानाच अनधिकृत पावसाळी पर्यटन त्याहूनही अधिक धोकादायक ठरत चालले आहे. आठवडय़ाच्या अखेरीस जवळपास कुठे तरी पर्यटनाला जाण्याचा प्रकार वाढीस लागत असून जलाशय किंवा जंगल अशी दोन पर्यटनस्थळे जवळ केली जातात. यातील अधिकांश स्थळांना कुणीही वाली नसल्यामुळे पर्यटकांचा अतिउत्साह त्यांच्याच जीवावर बेतत असल्याचे वेणा येथील घटनेने सिद्ध झाले आहे.
पर्यटनाच्या व्याख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. ते फक्त क्षीण घालवण्यासाठी नाही तर मौजमजेचे साधण झाले आहे. राज्यात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. हे तलाव मासेमारीसाठी जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते स्थलांतरित पक्ष्यांसाठीही आहेत. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत याही तलावांची ओळख अनधिकृत पर्यटन स्थळांच्या रूपाने होऊ लागली आहे. या ठिकाणांवर पर्यटन कमी आणि पर्यटनाच्या नावावर धिंगाणा अधिक घातला जात आहे. तलावाच्या काठावर वाहने घेऊन जाणे, त्याठिकाणी मांस शिजवणे आणि सोबतीला दारू ही पर्यटनाची व्याख्या रूढ होते आहे. उरलेले मांस त्याच ठिकाणी टाकणे, दारूच बाटल्या फोडून टाकणे आणि जेवणासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या प्लेट आणि इतर सामान त्याच ठिकाणी टाकून परतणे ही या पर्यटकांची मानसिकता आहे. या सर्वामध्ये निसर्ग अधिक ओरबडला जातोय, पण त्याचवेळी माणसाला जीवदेखील गमावावा लागत आहे.
नागपूर जिल्ह्यातल या आसपासच्या तलावांवर २० ते २५ हजार पर्यटक भेटी देतात, पण त्याची कुठलीही नोंद प्रशासनाकडे नसते. यात तरुणाईचा अधिक भरणा आहे आणि याच तरुणाईवर असामाजिक तत्त्वांकडून वाईट प्रसंगही ओढवले आहेत. मात्र, अनधिकृत अशा या पर्यटनावर कुणाचेही वर्चस्व नाही. नागपूरपासून जवळच असलेले वाकी हे एक पर्यटनस्थळ म्हणून समोर येत असले तरीही या ठिकाणीसुद्धा जलाशयावर अतिउत्साहात पर्यटक जीव गमावून बसले आहेत.
हिंगणा परिसरातील मोहगाव झिल्पी या तलावात पर्यटकांचा अतिउत्साह त्यांच्याच अंगलट येऊन बळी घेऊन गेला आहे. वर्धा मार्गावरील कानोलीबारा, सालई या ठिकाणच्या जलाशयांमध्ये अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. या सर्वच तलावांवर २० ते २५ हजारांच्या संख्येने लोक जातात. मात्र ते पर्यटन कमी आणि धिंगाणा अधिक असतो. त्यामुळे या जलाशयांवर अवैध कारवायांनाही ऊत आलेला आहे.
’जलाशयावरील पर्यटनाचाच हा किस्सा नाही तर जवळपासच्या जंगलात जाऊन पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा घालण्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. मग ते अंबाझरीचे जंगल असो, वा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालाय म्हणून नावारूपास येणारे गोरेवाडा. अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पांचा न झेपणारा खर्च आणि खानपानावर असलेले त्यांचे नियंत्रण यामुळे एक दिवसाच्या जंगलभ्रमंतीसाठी मग अंबाझरी, गोरेवाडासारखी ठिकाणे निवडली जातात. वनखात्याच्या अखत्यारित हा परिसर येत असला तरीही आत प्रवेश करण्यासाठी असणारे अनेक मार्ग आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे या जंगलातसुद्धा खाणपाणाचे साहित्य, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या हा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. निसर्गप्रेमी दरवेळी परिसर स्वच्छ करून येतात, पण आठवडाभरातच स्थिती पुन्हा तशीच होते.
’जलाशयांवरील पर्यटनाचा सर्वाधिक धोका त्या ठिकाणच्या स्थलांतरित पक्ष्यांना होत आहे. या ठिकाणांवर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी या पक्ष्यांची शिकार होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने गेल्या काही वर्षांत स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याच ठिकाणच्या वृक्षांची तोड करून चुली पेटवण्यासाठी ती लाकडे वापरली जात असल्याने निसर्ग ओरबाडला जात आहे. एवढय़ावरच थांबले नाही म्हणून की काय तर सर्व कचरा पर्यटक त्या ठिकाणी टाकून जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे.