अकोला : सहा महिन्यांपासून वेगळी राहणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी पती मद्यप्राशन करून गेला. त्याठिकाणी पत्नीबाबत विचारणा करून त्याने दोन मेहुण्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर दोन मेहुण्या व मुलाकडून केलेल्या मारहाणीत मद्यपेयी जावयाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणात पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे.
कानशिवणी येथील रहिवासी नागेश पायरूजी गोपनारायण (वय ४० वर्ष) हे बुधवारी सायंकाळी ग्राम अंबाशी येथे आले. या ठिकाणी राहणाऱ्या मेहुणीच्या घरी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत ते गेले. गत सहा महिन्यांपासून वेगळी राहणाऱ्या पत्नीबाबत विचारणा करून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी दोन मेहुण्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहुन एका मेहुणीच्या मुलाने जवळच पडलेला लाकूड व तीक्ष्ण हत्याराने नागेश गोपनारायण यांच्या डोक्यावर वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घरासमोरील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून नागेश गोपनारायण यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती पातूर पोलिसांना देण्यात आली. पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून घटनेचा पंचनामा केला. आरोपी घटनेनंतर पसार झाले होते. पातूर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अंबाशी व गावाच्या परिसरात आरोपींची शोध मोहीम राबवली. दडून बसलेल्या आरोपींचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने शोध घेतला.
सिध्दार्थ शांताराम चोटमल, (वय २२ वर्षे, रा. अंबाशी), रेखा शांताराम चोटमल, (वय ४५ वर्षे, रा. अंबाशी), नंदा दिलीप डोंगरे, (वय. ४० वर्षे, रा. मलकापुर, ता. जि. अकोला) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल विचारपूस केली. पोलीस चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यावरून पातूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, बाळापूरचे उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड, पोलीस उपनिरीक्षक बंडु मेश्राम, तारासिंग राठोड, वसिमोद्दीन, वसीम शेख, अनिल ठाकरे, शरद साबे, शंकर बोरकर, अक्रम पठाण आदींनी केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.