वर्धा : आधीच पोलीस आणि त्यात परत मद्य पिले असेल तर काय होईल, याचे धक्कादायक प्रत्यंतर वर्धेत आले आहे. खासगी कार चालवीत जाणाऱ्या महिला पोलीस शिपायाने एका दुचाकीस्वारास उडविले. त्यात रितिक कडू व पवन आदमने हे दोघे जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत सोडण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री तशी तक्रार रामनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाई करणार असल्याचे लोकसत्ता ऑनलाईनला सांगितले. कडू व आदमने हे आपल्या दुचाकीने आर्वी नाक्याकडे निघाले होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या एम एच ४८ पी ०८६४ या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. दोघेही जखमी झाले. अपघात झाल्याचे दिसून येताच उपस्थित नागरिकांनी तिथे धाव घेतली. तेव्हा स्टेअरिंग सीटवर महिला पोलीस दिसून आली. नागरिकांनी हटकल्यावर ती नशेत असल्याचे दिसून आले. सोबतच कारच्या मागच्या सीटवर एक पोलीस अंमलदार निपचित पडून असल्याचे नागरिकांना दिसले. दोघांना पण नागरिकांनी जब विचारणे सुरू केले तेव्हा या दोघांनी पोलिसी तोऱ्यात रुबाब झाडत पळ काढला.
हेही वाचा – तापमान वाढताच विजेची मागणी २६ हजार मेगावॉटवर, एवढ्या विजेची उपलब्धता…
हेही वाचा – ‘जनसंवाद’ अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे मुंबईकडे; म्हणाले, मनोहर जोशी…
या अपघाताची नोंद घेण्यात आल्याचे रामनगर पोलिसांनी स्पष्ट केले. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बंदीची जबाबदारी असणारे पोलीसच असे बेधुंद वर्तन करणार असेल तर पाहायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना एका सतर्क नागरिकाने शूट करीत त्याचा व्हिडीओ पण काढला. पोलीस शिपायाने अपघात करण्याची ही चौथी घटना असल्याचे सांगितल्या जाते. यापूर्वीच्या तीन घटनेत तिघांचा बळी गेला होता.