दारूड्यांना कधी कशाचा राग येईल याचा नेम नसतो. अशीच एक घटना जिल्ह्यातील घाटंजी येथे घडली. एका दारूड्याने ‘ब्रेड पकोडा’करिता टपरीचालकाचे नुकसान केले. या घटनेनंतर पोलिसांनी दारूड्या व्यक्तीची दबंग स्टाईलने रस्त्यावरून वरात काढली आणि अनेकांनी समाधान व्यक्त केले.
घाटंजी शहरातील मुख्य चौकात गोविंद टॉकीजजवळ एक विक्रेता हातगाडीवर स्नॅक्स विकतो. रविवारी सायंकाळी त्याच्या टपरीवर विक्रम चरणसिंह राठोड (२४, रा. नेहरूनगर, घाटंजी) आला. त्याने टपरीचालक संदीप प्रभाकर भेंडारकर याला एक ब्रेड पकोडा उधारीत मागितला. मात्र, संदीपने विक्रमला ब्रेड पकोडा उधारीत देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या विक्रमने थेट गॅसवरील तेलाची भली मोठी कढई उलटवून दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर येथे गाडी कशी लावतो, अशी धमकी देत जवळच्या शस्त्राने संदीपवर हल्ला केला. यात संदीपच्या उजव्या हाताला जखम झाली. हा वाद मुख्य रस्त्यावर सुरू असल्याने बघ्यांची गर्दी झाली.
हेही वाचा >>>Agniveer Recruitment: विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरती; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया…
वाद वाढल्याने परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने पटापट बंद केली. कोणीतरी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बघ्यांना पांगवले. सहायक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला दबंग स्टाईल प्रसाद देत त्याची रस्त्यावरून वरात काढली. यामुळे व्यवसायिकांमध्ये दहशत पसरू पाहणाऱ्या आरोपीला चांगलीच अद्दल घडली, अशी प्रतिक्रिया परिसरातील व्यवसायिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी विक्रम राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.