लोकसत्ता टीम

गोंदिया: ‘लम्पी’ आजार आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गोंदिया जिल्ह्यातील चिखली येथील तीन जनावरे एक आठवड्यात लम्पीने दगावली असून परिसरात अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.

मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला. मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली. लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे हा आजार आटोक्यात आला, असे वाटत असतानाच जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आजाराने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा… आरोग्य मंत्र्यांनी शब्द फिरवला; संतप्त आरोग्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर

जिल्ह्यात लम्पी आजार झपाट्याने पसरत असून, जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली आणि परिसर नवेगाव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन बफर क्षेत्रात असल्याने पाळीव जनावरांबरोबरच इतर वन्यजिवांनाही लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून लसीकरणाची गरज आहे.

हेही वाचा… सावधान! उष्णतेची लाट येणार, राज्यात हवामान बदलाचे पर्व सुरू; हवामान खाते म्हणते….

दवाखाना आहे, पण डॉक्टर नाही

सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे सर्व सोयीसुविधा युक्त असा जिल्ह्यातील सर्वात मोठा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र, मागील सहा वर्षांपासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारीच नाही, एका सहायक कर्मचाऱ्यावर दहा-बारा गावांची जबाबदारी असल्याने जनावरांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या ठिकाणाची जवाबदारी प्रभारींच्या खांद्यावर असून येथे त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी पशुचिकित्सक करताहेत उपचार

जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे, असे लक्षात आल्यावर पशुपालक पशुवैद्यकीय दवाखान्यात येतात. मात्र, तेथे डॉक्टरच उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खासगी पशुचिकित्सकांकडून जनावरांवर उपचार करवून घ्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. “पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता तर आहेच, यातील ४९ पदापैकी २२ जागेवर पशुअधिकारी, डॉक्टर असून उर्वरित २७ पदे रिक्त आहेत. यामुळे उपचारात अडचण येत आहे. मात्र, लम्पीमुळे झालेल्या जनावरांच्या मृत्यूमागे पशुपालकांचा निष्काळजीपणा, हे देखील एक कारण आहे, असे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.