गोंदिया :तुम्ही भारताचे नागरिक असाल, तर तुम्हाला जगण्याच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे, परंतु कोणत्याही धर्माबद्दल आणि महापुरुषांबद्दल अशोभनीय टिप्पणी किंवा अवमानकारक कृत्य करून धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे केल्यास तो निश्चितच कायदेशीर गुन्हा आहे.
गोंदिया शहरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील व्यापारी तरुणाने हे कृत्य केल्याने गोंदिया शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
शहरातील जयस्तंभ चौक ते गणेश नगर मार्गावर असलेल्या एका नामांकित दुकानाच्या चालकाने नको त्या ठिकाणी महापुरुषांची आणि धार्मिक स्थळांची चित्रे असलेल्या टाईल्स लावल्या आहेत. या जागेचा व्हिडिओ बुधवार, १६ एप्रिलला सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून एका धर्माचे लोक चांगलेच संतापले.
काही संतप्त तरुणांनी आरोपी तरुणाला त्याच्या शोरूममधून डॉ. आंबेडकर चौकात आणून बेदम मारहाण केली. काही तरुणांनी आरोपीची धिंड काढून त्याला मारहाण केली. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आरोपीला हात जोडून माफी मागण्यास भाग पाडले. मारहाणीमुळे दुखावलेला तरुणही सांगितल्याप्रमाणे करत राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शोरूम चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. असभ्य वर्तन आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंदविण्याची मागणी जमावाने केली. काही वेळातच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हे कृत्य करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध बुधवारी रात्री १०:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणात…
बुधवारी रात्री एका व्यापारी तरुणाने धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केल्याप्रकरणी काही तरुणांनी त्या व्यापारी तरुणाला मारहाण केल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. रात्री सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.