मनोज जरांगे पाटील यांचं नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी उभा केला आहे. जालन्यातल्या आंतरवली सराटी गावाचे मनोज जरांगे पाटील यांना मराठा योद्धाही म्हटलं जातं आहे. त्यांनी आता गावागावांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच चर्चा सुरु झाली आहे ती आणखी एका मनोज जरांगे पाटील यांची. होय मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसणारे तुळशीराम गुजर हे अकोल्यातल्या मराठा मोर्चाच्या सभेत सहभागी झाले आहेत. आज सकाळपासूनच त्यांच्यासह सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली आहे.
अकोल्यातले तुळशीराम गुजर हुबेहुब जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसतात
अकोल्यात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहुब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. अकोला शहरातून मनोज जरांगे पाटील यांच्यासारखाच वेश परिधान करुन ते निघाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसणारे तुळशीराम गुजर म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मला मित्रांनी सांगितलं की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसता. मला विश्वास बसला नाही. मोबाइलवर त्यांचा फोटो आणि माझा फोटो दोन्ही पाहिले तेव्हा विश्वास बसला. मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो याचा मला आनंद आहे. सध्या रस्तायवरुन जातो तेव्हा लोक माझ्यासह फोटो काढण्यासाठी गर्दी करतात.” टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं.
हे पण वाचा- “एकट्या छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
मराठा आंदोलनाला माझा पाठिंबा
“मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मला खूप आनंद झाला आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो. त्यांनी जे आंदोलन सुरु केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यांना पाठिंबा मिळालाच पाहिजे कारण मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.” असं तुळशीराम गुजर यांनी सांगितलं आहे.