वर्धा : देशात दसरा सण मोठया प्रमाणात साजरा केल्या जातो. ज्येष्ठ मंडळीस ‘ सोनं ‘ देत आशीर्वाद घेतल्या जातात. हे सोनं म्हणजे शमी वृक्षाची पानं. शमीचे पौराणिक महात्म्य अलौकिक. पुराणानुसार श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी शमी या वनस्पतीची पूजा केली होती. तसेच पांडवांनी वनवासात असतांना त्यांची अस्त्र शस्त्रे या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. वर्षभराच्या अज्ञातवासानंतर ते जेव्हा परत आले तो दिवस विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा. म्हणून या दिवशी शमी वृक्षाचे पूजन करीत सिमोलंघन केल्या जाते व आपट्याची पाने वाटल्या जातात. शमीपत्रे गणेशाची आवडती आहे. हा वृक्ष काटेरी, पान बारीक व नाजूक असतात. त्याला शेंगा लागतात. पण दसऱ्यास शमीची पाने लुटतात, असेच म्हटल्या जाते. हा आता दुर्मिळ वृक्ष होत चालला आहे.

दसऱ्यास सोनं लुटण्याची प्रथा आहे. म्हणून आपट्याच्या झाडाचे पान प्रतिकात्मक स्वरूपात वाटल्या जाते. हे झाड सर्व ऐकून आहेत. पण फार थोड्यांनी ते पाहले असते. ते ओळखता पण येत नाही. दसऱ्यास या आपट्याची किंवा त्यासारख्या दिसणाऱ्या इतर झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केल्या जाते. या झाडाची अश्मतक, वनराज, कंचनाल, झिंझेरी अशी अन्य नावे आहेत. शास्त्रीय भाषेत बाऊहिना रेसिमोसा म्हटल्या जाते. गुलमोहोर कुळातील हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळतात. याची पाने शेळी मेंढीस पौष्टिक चारा म्हणून उपयुक्त असतात. हा कुंभ राशीचा आराध्य वृक्ष आहे. मंदिराच्या दारात आवर्जून लावल्या जातो. याचीच पाने सोनं म्हणून वाटल्या जातात.

पण खरंच ही आपट्याची पाने आपण वाटतो कां ? तर पर्यावरण अभ्यासक व चारशेवर वृक्ष प्रजातीचा सांभाळ करणाऱ्या निसर्ग सेवा समितीचे प्रेरक मुरलीधर बेलखोडे म्हणतात की नाहीच. सोनं लुटण्याची दंतकथा आहे. खरं तर सोनं म्हणून जी पाने वाटल्या जातात ती कांचन वृक्षाची पाने असतात. महाराष्ट्रात तो मोठ्या प्रमाणात आहे. बहुपयोगी असे कांचन झाड बाऊहिना व्हेरीगेटा या शास्त्रीय नावाने नोंदल्या गेले आहे. झाड काटक व दुष्काळास यशस्वी तोंड देतो. त्यास रक्तकांचन, कचणार असेही म्हणतात.

रस्त्याच्या दूतर्फ, माती संधरणासाठी, पडीक जमीन विकासासाठी उपयुक्त. पानावर दहा, बारा शिरा असतात. मंद सुगंध असलेली फुले येतात. सालीपासून दोर बनतात, फुलांचा गुलकंद बनतो, बियापासून तेल निघते, खोकल्यावर तारक अशी ही वनस्पती आहे. पण आज याचीच आपट्याचे पान म्हणून मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. बेलखोडे सांगतात की शमी, आपटा व कांचन या झाडांचे भिन्न वैशिष्टय व गुणधर्म समजून घेतल्या गेले नाही. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देण्यासाठी आपट्यासारख्या दिसणाऱ्या कांचन वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड केल्या जात आहे. आपट्याचं झाड की दसऱ्याचं सोनं, यात निवड करायची आहे. विवेकी निवड करण्याचा हा दिवस असल्याचे बेलखोडे म्हणतात. कांचन व आपट्याची झाडे यावर संक्रांत आणणारा दसरा कसा साजरा करायचा याचे भान येणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी कळकळीने सांगत आहे.