अकोला : आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभात ‘ई-केवायसी’ चा मोठा खोडा आहे. योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे शिधापत्रिकाधारक पात्र असले तरी त्यांना आयुष्मान कार्ड तयार करून घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात नऊ लाख ७७ हजारावर लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’ झाले नसून त्यांच्याकडे कार्डच नाहीत. त्यामुळे असंख्य गरजू रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार व एक हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्ह्यात सात लाख ६० हजार ३५० कार्ड तयार झाले आहेत. लाभार्थ्यांची एकूण संख्या १७ लाख ३३ हजार १६ आहे. उर्वरित ई-केवायसी प्रलंबित आहे. ती पूर्ण करून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. गावे, वस्त्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ‘ई-केवायसी’ सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात खासगी व शासकीय मिळून ४० रुग्णालय योजनेला जोडली आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.
लाभार्थी स्वतःच्या भ्रमणध्वनीवर देखील आयुष्मान ॲप डाऊनलोड करून ‘ई-केवायसी’ करू शकतात. आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांवर पाच लाखापर्यंत मोफत उपचार केले जाऊ शकतात. त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याची मात्र सक्ती आहे. असंख्य गरजू रुग्णांकडे ते कार्ड नसल्याने ते योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
वाशीम जिल्ह्यात ६.३७ लाख लाभार्थ्यांना कार्डची प्रतीक्षा
वाशीम जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी १ एप्रिल २०२० आणि २८ जुलै २०२३ पासून सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी करण्यात आली. आतापर्यंत तब्बल ११ लाख ५३ हजार ९५७ लाभार्थी पात्र झाले आहेत. मात्र, त्यापैकी जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ७७७ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना कार्डची प्रतीक्षा आहे. वाशीम जिल्ह्यातील नऊ शासकीय व २० खाजगी रुग्णालये अंगीकृत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार १४५ लाभार्थ्यांनी शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घेतला आहे. त्यावर शासनाकडून ६४ कोटी ५९ लाख ९६ हजार ७७० रुपयांचा खर्च मंजूर केला. वाशीम जिल्ह्यात सुद्धा गरजू रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी योजनेशी जुळलेले रुग्णालय रुग्णांच्या कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत.