वर्धा : प्रयोगशील तरुणांची भारतात कमी नाही. खूप शिकलेलेच नव्हे तर जेमतेम शिकलेले तरुण पण यात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. उपलब्ध साधनात जीवनपयोगी उपकरण शोधून काढणाऱ्या होतकरू मुलांना जुगाडू म्हणून ओळखल्या जाते. हा असाच एक जुगाडू.

शेतात राखण करण्यासाठी त्याने तयार केलेली प्रकाशयुक्त मचान चांगलेच चर्चेत होते. आता हा नवा फंडा. ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल असा. त्याचे आता मार्केटिंग पण सूरू करण्याचा विचार आहे. हे खरं स्टार्ट अपचे मानकरी, असे लोकं म्हणताहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी गॅस सिलिंडर हे महागाईमुळे होरपळून काढत आहे. सिलेंडर कोपऱ्यात आणि चुलीच पेटलेल्या असे चित्र दिसणे सूरू झाले आहे. गावात केरकचरा, वाळलेले पिक, सुकलेली झाडे विपुल. म्हणून त्याचा इंधन म्हणून वापर केल्या जातो. पण त्यात निघणाऱ्या धुराने बाया बापडया त्रस्त. माऊलींचे हे हाल पाहून आर्वी तालुक्यातील कासारखेडा या गावातील योगेश लिचडे या शेतकरी पुत्राने शक्कल लढविली.

कष्ट व कल्पकतेच्या जोरावर धूररहित शेगडी विकसित केली आहे. लाकूड, कोळसा, कचरा अशा इंधनावर चालणारी ही शेगडी केवळ धूररहितच नाही, तर विजेवर किंवा सौरऊर्जेवर चार्जिंग करून वापरता येणारे उपकरण आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून शेतीतून उत्पन्न अपुरे असल्यामुळे योगेशने वेगळा मार्ग शोधला.

गॅसच्या महागाईत ग्रामीण महिलांना दिलासा मिळावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, या हेतूने त्याने संशोधन सुरू केले आणि अनेक प्रयोगांच्या धकाधकीनंतर धूररहित शेगडी तयार करण्यात त्याला यश मिळाले.

योगेश लहानपणापासूनच नवनवीन उपकरणे बनविण्यात रस घेऊ लागला. याआधी त्याने डवरणी यंत्र, लहान ट्रॅक्टर, फवारणी पंप, व्हीआयपी मचान, अशी अनेक साधने तयार केली होती. त्यातील व्हीआयपी मचानला शेतकरी व नागरिकांकडून चांगली पसंती मिळाली होती. त्याच जोशात त्याने आता ग्रामीण महिलांच्या दैनंदिन गरजांसाठी धूररहित शेगडीचा शोध लावला आहे.

ग्रामीण भागात पर्याय म्हणून धूररहित शेगडी मोठा बदल घडवू शकते. केवळ पैशांची बचतच नाही, तर आरोग्य आणि वेळेच्या दृष्टीनेही ही शेगडी उपयोगी पडणार आहे.

योगेश म्हणतो, गेल्या काही वर्षांत गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. महिन्याला गॅस सिलिंडर खरेदी करणे ग्रामीण भागातील कुटुंबांना अवघड झाले आहे. अशा वेळी ही धूररहित शेगडी महिलांसाठी वरदान ठरणार ठरेल. केवळ २५–३० रुपयांत महिन्याचा चार्जिंग खर्च भागतो. आणि गॅसच्या हजारोंच्या खर्चातून दिलासा मिळतो. ग्रामीण भागातील महिला अनेकदा लाकूड किंवा कोळसा वापरताना धूरामुळे त्रस्त होतात. या शेगडीच्या धूररहित तंत्रज्ञानामुळे त्यांच्या आरोग्याचे रक्षण होणार आहे. वेळ पण वाचणार. या शेगडीचे वैशिष्टय म्हणजे लाकूड, कोळसा, कचरा इंधन म्हणून वापरता येतो.

विजेवर चार तास चार्जिंग केल्यास शेगडी तब्बल ५–६ दिवस चालते.महिन्याचा चार्जिंग खर्च फक्त २५ ते ३० रुपये सौर पॅनेलवरही चालणारी शेगडी तयार केली आहे. अल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी.

शेतकरी कुटुंबाचा आधार

अतिवृष्टी, हवामानातील अनिश्चितता आणि शेतीतील खर्चामुळे लिचडे कुटुंबाचे उत्पन्न फारसे होत नव्हते. अशा स्थितीत योगेशने स्वतःच्या मेहनतीतून नवे प्रयोग सुरू केले. आपण काहीतरी वेगळे करून दाखवावे, ज्याचा उपयोग समाजाला होईल, या भावनेतून त्याची वाटचाल सुरू झाली. कृषी कन्या शेगडी हे त्याचेच फलित. आज या उपकरणाच्या विक्रीतून त्याच्या कुटुंबाचा गाठा चालतो आहे.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त कुटुंबांना ही शेगडी पोहोचावी, यासाठी पुढील काही महिन्यांत उत्पादनाचा विस्तार करण्याचे नियोजन करत आहेत. शेतकरी व ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळावा, यासाठी हा प्रयत्न सतत सुरू राहणार असल्याचे योगेश लिचडे सांगतात. इतर पण अश्या शेगड्या आहेत. यात काय वेगळे ? तर ते म्हणतात या शेगडीत ब्लॉवर बसविले आहे. त्यासाठी बटण दिले.

जळत्या इंधनातून निघणारा धूर शोषून घेतल्या जातो. कसाही कचरा असो तो त्वरित पेट घेतो. ज्वाला नियंत्रित करता येतात. कमी इंधन लागत असल्याने फारशी पायपीट करावी लागत नाही.