गडचिरोली : खाणपट्ट्याचे खुले लिलाव न करता ‘जिंदाल’सारख्या कंपनीला अल्प महसूलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. यातून सत्तेतील तीनही पक्षाला महिन्याकाठी प्रत्येकी ५०० कोटी रुपये अवैधपणे मिळणार असल्याचा गंभीर आरोप १७ मे रोजी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. १९ मे रोजी माजी खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे खंडण करत काँग्रेस नेत्यांवर पलटवार केला. शिवाय बिनबुडाचे आरोप केल्यास ईडी चौकशीची मागणी सरकारकडे करु, असा इशाराही दिला.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, माजी नगराध्यक्षा योगीता पिपरे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोवर्धन चव्हाण उपस्थित होते.
यावेळी अशोक नेते यांनी वडेट्टीवार यांचा नामोल्लेख टाळत तर खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम यांचा नामोल्लेख करत तपशीलवार खुलासा केला. ते म्हणाले, भाजपनेच भूमिअधिग्रहण कायदा आणला, ज्याद्वारे एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केल्यास चार पट मोबदला देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेण्याचा प्रश्नच नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस नेते शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करत आहेत. हा खटाटोप वसुलीसाठी की कशासाठी हे सर्वांना माहीत आहे.
आम्ही उद्योगविरोधी नाही असे दावे ते करतात, पण मतांच्या राजकारणासाठी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतात, असा टोला अशोक नेते यांनी लगावला.
काँग्रेस नेत्यांकडून खंडणी वसुली
माझ्या काळात मंजूर केलेल्या कामांचीच खासदार डॉ. नामदेव किरसान भूमिपूजने करत आहेत, असा आरोप अशोक नेते यांनी केला. दहा वर्षांत मागील ५० वर्षांत झाली नाही तेवढी कामे केली. मात्र, विद्यमान खासदारांनी वर्षभरात एक तरी प्रकल्प आणला का ते दाखवा, असे आव्हान नेते यांनी दिले. कामांना विरोध करायचा अन् चंदा गोळा करायचा, असे त्यांचे काम, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.