अकोला : ‘ईद-ए-मिलादुन्नबी’निमित्त शहरातून मंगळवारी मिरवणूक काढण्यात आली. यातून राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. ईद ५ सप्टेंबरला झाली असली तरी गणेशोत्सवामुळे तीन दिवसानंतर आज मिरवणूक निघाली होती. गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या निमित्ताने शहरात हिंदू – मुस्लीम एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला. शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ९ सप्टेंबरला काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
त्यानुसार शहरातून आज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला सय्यद झाकीमिया नक्शबंदी, आमदार साजिद खान पठाण, समितीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान, कच्छी मशिदीचे अध्यक्ष जावेद झकेरिया आदींनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी आझम ब्रार, मौलाना मोहम्मद अर्शद रझा कादरी, मुफ्ती इस्माइल साहिब, मौलाना मोहम्मद इस्माइल रझा, हाफिज मकसूद, मौलाना रियाज आदींसह शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यामध्ये आध्यात्मक देखावे साकारण्यात आले होते.
या मिरवणुकीत ‘बैद’ समुदायाचा ऐतिहासिक ‘आलम’ देखील समाविष्ट होता. पूर्वी ही परंपरा केवळ रमजान ईद आणि बकरी ईदपुरतेच मर्यादित होती. आजची मिरवणूक ताजनापेठ, फतेह चौक, न्यू क्लॉथ मार्केट, खुले नाट्यगृह चौक, गांधी रोड, महापालिका चौक, दगडी पूल, लकडगंज, माळीपुरा, माणिक टॉकीज, अकोट स्टँड, सुभाष चौक आणि मोहम्मद अली रोड मार्गाने पुढे पुन्हा ताजनापेठ येथे पोहोचली. सामूहिक नमाजानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. पोलीस प्रशासनाने संपूर्ण मिरवणुकीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
गणेशोत्सव मंडळाकडून मिरवणुकीचे स्वागत
‘ईद-ए-मिलादुन्नबी’ ५ सप्टेंबर रोजी होती. ६ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक असल्याने मुस्लीम समाजाने सलग तिसऱ्या वर्षी मिरवणुकीची तारीख पुढे ढकलत एकात्मतेचा संदेश दिला. यावर्षी आज, ९ सप्टेंबर रोजी ईदनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक समितीचे गांधी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे स्वागत केले. यानिमित्त हिंदू-मुस्लीम एकोपा दिसून आला.
शाळा, महाविद्यालयांना मिळाली सुट्टी
धार्मिक सलोखा आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज ईदनिमित्त सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आज सर्व शाळा व महाविद्यालय बंद होते.