|| महेश बोकडे
वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये
नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०२१ मध्ये करोना, म्युकरमायकोसीसनंतर डेंग्यूचाही उद्रेक झाला. वर्ष २०१४ नंतर येथे २०२१ या वर्षी सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण नोंदवले गेले. सोबतच २०२१ या वर्षी सर्वाधिक २४ डेंग्यूग्रस्तांचा मृत्यू झाला.
पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे सहा जिल्हे येतात. येथे २०१४ मध्ये डेंग्यूचे २०९६ रुग्ण आढळले होते. यापैकी उपचारादरम्यान ४३ रुग्ण दगावले. आरोग्य विभागाने डेंग्यूची ही रुग्णसंख्या व मृत्यू बघता या भागात डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपाय केले. त्यामुळे २०१५ मध्ये येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४१४ इतकी खाली आली. उपचारादरम्यान ३ रुग्ण दगावले. २०१६ मध्ये ही रुग्णसंख्या आणखी खाली म्हणजे २९१ रुग्णांवर आली. एका रुग्णाचा मृत्यू झाला.
पूर्व विदर्भात २०१७ मध्ये ३२१ रुग्ण आढळले, ६ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १ हजार १९९ रुग्ण आढळले, ११ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये येथे १ हजार ३१६ रुग्ण आढळले. ११ रुग्ण दगावले. २०२० मध्ये ५०३ रुग्ण आढळले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, मार्च २०२० पासून पूर्व विदर्भात करोनाचा प्रकोप सुरू झाला. त्यामुळे किटकजन्य आजाराशी संबंधित विभागातील कर्मचाºयांच्या सेवाही करोनाशी संबंधित कामात लावल्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे २०२१ मध्ये डेंग्यूचा उद्रेक बघायला मिळाला. या वर्षी पूर्व विदर्भात गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ३,६२८ रुग्ण आढळले. यापैकी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णसंख्येला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाºयाने दुजोरा दिला आहे.
सात मृत्यूंची भर
नागपूर विभागात २०२१ मध्ये १७ रुग्ण दगावल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाकडे होती. परंतु नुकतेच डेंग्यूच्या मृत्यूचे अंकेक्षण झाले. त्यात नव्याने नागपूर शहरात १, नागपूर ग्रामीणला १, चंद्रपूर १, वर्धा १, भंडारा १, गडचिरोलीत २ असे एकूण ७ मृत्यू डेंग्यूमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथील मृत्यूसंख्या १७ वरून थेट २४ रुग्णांवर पोहचली.