वर्धा : आज वर्धा येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन चांगलेच चर्चेत आले. ते स्वतः म्हणून गेले की एका तासात मी दोनदा वर्ध्यात येऊन गेलो. कार्यक्रम होता वर्धा जिल्हा मोतीबिंदूमुक्त अभियान शिबिराचा. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन सेवाग्राम येथील चरखा सभागृहात केले होते. यावेळी मंत्री संजय राठोड व प्रकाश आबीटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता असलेला हा कार्यक्रम विजेचा कडकडाट व मुसळधार पावसामुळे तब्बल अडिच तास उशीरा सूरू झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अखेर व्यासपीठावर आगमन झाले आणि आयोजकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शिंदे हे एकदा वर्ध्यात येऊन गेले, या संदर्भाचा धागा जोडत आपल्या भाषणाच्या प्रारंभीच ते म्हणाले, अरे मी आत्ताच दोनदा येऊन हॅलो केले. त्याची उकल करताना शिंदे म्हणाले, निघतांना पावसास सुरवात झाली. कार्यक्रमस्थळी येताच पाऊस जोरात. हेलिपॅड दिसेना. गोंधळ झाला. पायलट म्हणाला आता उतरणे कठीणच. खाली काही दिसत नाही. परत फिरावे लागणार.
तेंव्हा उपमुख्यमंत्री शिंदे धीर देत पायलटला म्हणाले, प्रयत्न तर करून बघ. तर पायलट म्हणतो, प्रयत्न अंगलट येवू शकतो. परत गेलेलेच बरे. मग शिंदे स्वार असलेले हेलिकॅप्टर नागपूर साठी माघारी फिरले. खाली आयोजक हिरमुसले. नागपुरात पोहचताच शिंदे यांना परत बाय रोड येण्याची विनंती करण्यात आली. केवळ चेहरा दाखविण्यास तरी वर्ध्यात या. या विनंतीस मान देत उपमुख्यमंत्री शिंदे बाय कार समृद्धीमार्गे कार्यक्रमस्थळी पोहचलेच. स्वतः त्यांनी हा घटनाक्रम भाषणातून सांगितला.
आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की हा अत्यंत अभिनव असा उपक्रम आहे. आता मोतीबिंदूचे प्रमाण वाढत आहे. कमी वयात तो होवू लागला आहे. त्यामुळे अशी आरोग्य शिबीरे आवश्यक ठरतात. शासनाकडून पण दिलासा देण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी बैठक घेऊ. हे आमचे शासन जनतेसाठी आहे. विविध योजना यशस्वीपणे सूरू आहेत. शासन आपल्या दारी उपक्रम उपयुक्त ठरला. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो. म्हणून शासन गरजूच्या दारात जात लाभ देत आहे. विरोधक म्हणत लाडकी बहिण योजना बंद पडणार. पण मी खात्री देतो की योजना कधीच बंद पडणार नाही. महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप,जिडीपी, उद्योग, आरोग्य व अन्य क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने पुढे जाणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले, मोतीबिंदूमुक्त वर्धा जिल्हा, निरामय वर्धा जिल्हा हा आमचा संकल्प आहे. आज उपमुख्यमंत्री पाऊस घेऊन आले, त्याचा सर्वाधिक आनंद होतो. आम्ही वर्धेकर वाटच बघत होतो. हा विदर्भ प्रदेश कृषी प्रधान आहे. सहा जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जातात. म्हणून या आमच्या सरकारने सिंचनाची खूप कामे मार्गी लावली.
डॉ. भोयर म्हणाले, आमदार असताना मी व प्रकाश आबीटकर सभागृहात मागच्या भागात बसत असू. तेंव्हा पुढे बसायला केव्हा मिळणार, अशी चर्चा करायचो. पण मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांनी आम्हास आता मंत्री करीत पुढे बसण्याची संधी दिली. कार्यक्रमास आमदार राजेश बकाने, डॉ.विकास महात्मे व अन्य उपस्थित होते.