लोकसत्ता टीम

गडचिरोली : जिल्ह्यात एकीकडे ओडिशाहून आलेल्या रानटी हत्तींनी उच्छाद मांडला असताना दुसऱ्या एका हत्तीचे हृदयस्पर्शी वागणे मन जिंकून घेत आहे.

या हत्तीची समाज माध्यमावर सार्वत्रिक झालेली हत्ती कॅम्पमधील चित्रफीत बघून सारेच आवाक झाले आहेत. यात रूपा नावाची मादी माहुताला चक्क हापशी हापसून पाणी पाजत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेले राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प कायम चर्चेत असते. यावेळी रूपा हत्तीने माहुताबद्दल दाखवलेल्या प्रेमाची चर्चा आहे. झाले असे की, रुपाला गावात फेरफटका मारून आणल्यानंतर माहूत सुदीप तिला घेऊन पाणी पाजण्यासाठी हापशीजवळ गेला.

आणखी वाचा-बुलढाणा: खासगी बस दरीत कोसळली… २८ प्रवासी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाणी पिऊन झाल्यानंतर रुपा सोंडेने हापशी हापसू लागली. हे बघून माहूत सुदीप देखील पाणी पिऊ लागला. यावेळी जवळच असलेल्या पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. वनविभागाच्या अख्त्यारित येत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये सध्या नऊ हत्ती आहेत. चार दशकांपूर्वी अवजड कामे करण्यासाठी हे हत्ती येथे आणले होते. तेव्हापासून ते येथे आहेत. माहुतांच्या देखरेखीत त्यांना ठेवण्यात आले असून त्यांच्यासोबत असलेले हत्तीचे ऋणानुबंध अशा प्रसंगातून कायम अधोरेखित होत असतात.