बुलढाणा: खामगाव तालुक्यातून अतिशय धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अभियंता असलेल्या युवकाने, आपल्या भावाला मोबाईलवर शेवटचा मेसेज पाठवून आत्महत्या केली. विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या माता पित्याचा आक्रोश, नातवाईकांचे रुदन आणि महिलांनी फोडलेले हंबरडे याने, वातावरण शोकाकुल झाले. गावावर शोककळा पसरली…खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव आणि अटाळी शिवारात हा हृदयद्रावक घटनाक्रम घडला. बोरी अडगाव येथील विनायक टिकार यांचा रामरतन विनायक टिकार हा एकुलता एक मुलगा. त्याला कश्यातच कमी पडू न देता उच्च शिक्षित केले, अभियंता केले. त्याला लवकरच ‘जॉब’ देखील लागला. आयटी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बेंगलोर मध्ये काम सुरु केले. कालांतराने कंपनीने त्याला घरून काम ( वर्क फ्रॉम होम ) ची परवानगी सुद्धा दिली. यामुळे रामरतन टिकार हा आपल्या गावात परतला आणि घरूनच काम करू लागला.

असे सारे काही सुरळीत असताना आणि एकुलता एक वारसदार असताना रामरतन मात्र मनातल्या मनात नाराज होता, मनाशी खात होता. आपण अपयशी आहोत, असफल ठरलो असा पक्का समज त्याने करून घेतला होता.

‘आधी मेसेज मग सुसाईड’

याच कथित वैफल्यातून रामरतन टिकार याने आत्महत्येचा शेवटचा पर्याय निवडला. मात्र त्यापूर्वी त्याने  आपला चुलत भाऊ असलेल्या सुधीर विश्वास टिकार (वय ४२, राहणार वंदना नगर वाडी )याला मोबाईल ने शेवटचा संदेश पाठविला. ‘ मला चांगली नोकरी लागत नसल्यामुळे पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही, तुम्ही सकाळी येऊन माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या ‘असा तो संदेश होता. यामुळे हादरलेल्या  सुधीर आणि त्याच्या काकांनी अटाळी शिवारातील शेत गाठले. त्या विहिरीत रामरतन चा मृतदेह आढळून आला. याची माहिती सर्वत्र पसरताच इतर नातेवाईक आणि गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिलांचे  रुदन, हंबरडे आणि सोयऱ्यांचा आक्रोश याने वातावरण शोकाकुल झाले. एकुलत्या एक लेकाने आत्महत्या केल्याने टिकार दाम्पत्यावर मोठे संकट कोसळले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ नुसार घटनेची नोंद केली आहे. पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर या दुर्देवी घटनेचा तपास करीत आहे.