इच्छुक संस्थांचा उत्साह मावळला; अनुदानावरही प्रश्नचिन्ह

शफी पठाण

करोनाच्या अनपेक्षित स्वारीने यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पारंपरिक वारी धोक्यात आली आहे. संमेलनस्थळ ठरवण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही साहित्य महामंडळ आणि इच्छुक आयोजकांच्या पातळीवर सामसूम आहे!

कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही झुंजणारे सरकार संमेलनासाठी ५० लाखांचे शासकीय अनुदान देईल का, हा मोठाच प्रश्न असल्याने आधी मोठय़ा उत्साहाने आयोजनाचे निमंत्रण पाठवणाऱ्या इच्छुक संस्थांनीही आता तोंडावर बोट ठेवले आहे.

यंदाच्या संमेलनासाठी नाशिक व अंमळनेर येथून निमंत्रणे आली होती. त्यांचा विचार करून स्थळ निवड समिती गठित करण्यासाठी महामंडळाने २३ मार्च रोजी औरंगाबादेत बैठक आयोजित केली होती. परंतु मध्येच करोनाचे संकट उभे ठाकल्याने ही बैठक रद्द करावी लागली. साधारणत: मे महिन्यात स्थळ निवड समिती गठित होऊन जून किंवा जुलैमध्ये नियोजित संमेलनांच्या ठिकाणीही भेट देत असते. या समितीच्या अहवालानंतरच महामंडळ संमेलनस्थळाची घोषणा करीत असते.

या संमेलनासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला ५० लाखांचा शासकीय निधी यंदा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. याशिवाय ज्यांच्या बळावर हे संमेलन उभे केले जाते ते प्रायोजक स्वत:च आर्थिक संकटात सापडले आहेत. या सर्व अडचणींवर मात करूनही संमेलनाच्या आयोजनाचे धाडस केले तरी प्रत्यक्ष संमेलनाच्या दिवसापर्यंत स्थिती कशी असेल, प्रवासाची साधने उपलब्ध असतील का, असली तरी लोक संमेलनाला येतील का, याचे भाकित आज तरी करता येण्यासारखे नाही. त्यामुळे साहित्य महामंडळासह इच्छुक संस्थांही यंदाच्या संमेलनाची शक्यता जवळपास मावळल्याचे समजून चालत आहेत.

प्लेगच्या साथीचे स्मरण

१८७८ साठी पहिले ग्रंथकार संमेलन भरले होते. या संमेलनाचे शीर्षक अखिल भारतीय साहित्य संमेलन असे नसले तरी त्याचे स्वरूप तसेच होते. या क्रमातले दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली झाले. परंतु तिसरे संमेलन थेट १९०५ सालीच आयोजित करण्यात आले. या मधल्या कालखंडात ग्रंथकार संमेलन न होण्याचे एक कारण जशी स्वातंत्र चळवळीची सक्रियता होती, तसेच दुसरे कारण याच काळात आलेली प्लेगची साथही होती. प्लेगची साथीमुळे हजारो माणसे मरत असल्याने त्यावेळी ग्रंथकार संमेलन मागे पडले. प्लेगच्या त्याच कटू अनुभवाचे स्मरण आता करोनाने साहित्य क्षेत्राला करून दिले आहे.

संमेलनाच्या आयोजनासाठी आमच्या संस्थेने महामंडळाकडे निमंत्रण दिले होते. परंतु करोनाने सगळे गणितच बिघडवून टाकले आहे. शिवाय आमच्या संस्थेसमोर बरखास्तीची कायदेशीर अडचणही उभी ठाकली आहे. त्यामुळे या क्षणाला तरी संमेलाबाबत काहीच बोलता येणार नाही.

-वसंत खरनार, सदस्य, सार्वजनिक वाचनालय, नाशिक

करोनाच्या या संकटाचे सर्वच क्षेत्रावर दूरगामी  परिणाम होणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या जीवघेण्या संकटात प्रथम माणूस टिकणे आणि तो पुन्हा उभा राहणे जास्त महत्वाचे आहे त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. या संकटानंतर समाजाची बदललेली  मानसिकता आणि प्राधान्यक्रम  यांचा संवेदनशीलतेने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.

-प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे</p>

माणसे माणसांजवळ जाण्यास घाबरत असताना संमेलनाची कल्पनाच करवत नाही. संमेलनाच्या आयोजनासाठी महामंडळाने प्रक्रिया सुरू केली होती. परंतु मध्येच करोनाचे संकट उभे ठाकले. ते कधी संपणार काही माहीत नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात किमान सप्टेंबपर्यंत तरी काहीच बोलता येणार नाही.

-कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय

मराठी साहित्य महामंडळ