काही तासांच्या बैठकीवर लाखो रुपयांची उधळण
‘साधी राहणी उच्च विचार’ अशी संघाची विचारसरणी मानली जाते, पण या विचारसरणीला छेद देण्याचा प्रयत्न केंद्रात मंत्री असलेल्या एका स्वयंसेवकाने दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. संघाचे कार्यालय ज्या नागपुरात आहे, त्या नागपुरात संघाची ताकद तर कमी झाली नाही ना असाही सूर केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वनखात्याच्या हॉटेलमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर उमटला आहे. काही तासांच्या बैठकीवर लाखो रुपयांची उधळण झाली आहे.
राज्याच्या वनखात्याचे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे साहाजिकच या खात्याचे राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री या ठिकाणी येणे, बैठका घेणे हे क्रमाने आलेच. त्यामुळे या बैठकांसाठी सेमिनरी हिल्सवर मोठे वन सभागृह बांधण्यात आले आहे. आजपर्यंत वनखात्याच्या जेवढय़ाही बैठका झाल्या, त्या वन सभागृहातच झाल्या. बबनराव पाचपुते, पतंगराव कदम यांनीही वनमंत्री असताना बैठकांसाठी वन सभागृहालाच पसंती दिली. एवढेच नव्हे तर तत्कालीन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीदेखील बैठकांसाठी वन सभागृहाचाच आधार घेतला. मात्र, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वनखात्याची आढावा बैठक वन मुख्यालयात ठरलेली असताना ऐनवेळी बैठकीचे स्थळ बदलवले आणि वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडचा आधार त्यांनी घेतला. वास्तविक जावडेकरांकडून हे अपेक्षित नव्हते, कारण जावडेकरांची साधी राहणी सर्वानाच परिचयाची आहे. त्यांना सुरक्षा कवचाचा फारसा सोस नाही, त्यामुळे नागपुरात मुक्काम असतानासुद्धा ते सकाळी सहजपणे फिरायला बाहेर पडतात, हेही नागपूरकरांनी अनुभवले. त्यामुळे रविवार, ३ एप्रिलला वनखात्याच्या आढावा बैठकीचे स्थळ त्यांनी बदलवण्यास सांगितल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले.
अलीकडच्या काळात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी बैठकांसाठी हॉटेलचाच पर्याय निवडला आहे आणि त्यामुळे वनखात्याची स्वत:ची इमारत, सभागृह असतानासुद्धा केवळ काही तासांच्या बैठकीवर लाखो रुपयांची उधळण केली गेली. खासदारांची कम्पा समिती आली असतानासुद्धा हॉटेलचाच आधार घेण्यात आला.
त्याचवेळी मध्यप्रदेशात ही बैठक वनखात्याच्या रिसॉर्टमध्ये घेण्यात आली होती. मात्र, जावडेकरांकडून या उधळपट्टीची ही अपेक्षाच केली गेली नाही. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे ज्या वने आणि पर्यावरण खात्याचे ते मंत्री आहेत, त्या पर्यावरणालाही त्यांनी दूर सारले. ‘कार्बन फुटप्रिंट’ कमी करा असे एकीकडे या खात्याकडून बजावले जात असताना, दुसरीकडे मात्र हॉटेलमध्ये बैठका घेऊन ते वाढवण्याचेच काम त्यांनी केले. एरवी जावडेकर नागपुरात आले तर नीरीतील विश्रामगृहाचा आधार घेतात, पण संघाच्या तालमीत तयार झालेल्या जावडेकरांना यावेळी हॉटेलचा आधार का घ्यावा लागला, हे कोडे अनेकांसाठी न उलगडणारे ठरले आहे.