भारतात आणि विदेशातही मागणी; नागपूरकरांना मात्र माहितीच नाही

नागपूर : देशी बाजारपेठेवर विदेशी वस्तूंची छाप नेहमीच पडत आली आहे, पण अजूनही काही गोष्टी अशा आहेत, ज्यावर विदेशी वस्तूंचा प्रभाव फारसा जाणवत नाही. दिवाळीत मातीच्या दिव्यांचा वापर होतोच, पण त्याहीपेक्षा प्राणवायू देणारे पर्यावरणपूरक शेणाचे दिवे तयार करण्याची किमया उपराजधानीतील एका गृहिणीने साधली आहे. तीन वर्षांपासून तयार होत असलेल्या या दिव्यांना भारतात आणि विदेशातही मागणी आहे.

तीन वर्षांपूर्वी आंबिलवाडे कुटुंबात दोन गाईंचा प्रवेश झाला. गाईचे दूध आणि शेण घरीच वापरात येत होते. मग त्यापासून आणखी काही करता येईल का, याचा विचार सुरू झाला. काही करायचे तर आथिर्क बांधणी करावी लागणार होती. तरीही यामिनी आंबिलवाडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शेणापासून दिवे तयार करायला सुरुवात केली आणि आता तब्बल १९ कारागीर त्यांच्याकडे काम करतात. ऑक्सिजन पुरवणाऱ्या या दिव्यांना विदेशातही अधिक मागणी आहे. हा दिवा पूर्णपणे जळतो. जळल्यानंतर त्यातून सुमारे दीड किलो ऑक्सिजन बाहेर पडतो. दिवा जळल्यानंतर होणारी राख कुंडय़ांमध्ये खत म्हणून वापरता येते. तसेच बेसिनमध्ये राख टाकल्यानंतर त्याची नळीदेखील स्वच्छ होते. भांडी घासण्यासाठी पूर्वी राखेचा वापर केला जात होता, तो देखील करता येतो. देशी गाईचे तूप असणारा शेणाचा दिवा तूप संपल्यानंतरही जळतो आणि त्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो.

यामिनी आंबिलवाडे या शेणापासून दिव्यांसह इतरही कलाकृती तयार करतात. आता त्या अडीच फुटाचे शेणाचे कंडे तयार करत आहेत, त्याचा वापर अंत्यसंस्कारासाठी केला जातो. गणपतीच्या मूर्तीही त्या शेणापासून तयार करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शेणाची गणपतीची मूर्ती तयार केली होती. लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीची मूर्तीही तयार करतात. त्यामुळे लोकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. हरिद्वारसारख्या ठिकाणी नदीच्या पात्रात दिवे सोडले जातात. त्या लोखंडी दिव्यांनी पाणी प्रदूषित होते. त्याऐवजी मातीचे दिवे वापरले तर मासे आणि पाणी यावर काहीच परिणाम होत नाही. याउलट पाणी शुद्ध होईल. यात तुपाची वात तयार करून दिवे सेट करण्यात आले आहे. त्याठिकाणी मागणीही अधिक आहे. उपराजधानीत पर्यावरणपूरक कार्य घडत असताना बाहेर या दिव्यांना जेवढी मागणी आहे, तुलनेने शहरात अजूनही एवढी जागरूकता आलेली नाही.

कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले

नणंदेकडे आम्ही गाईपासून मिळणारे शेण, गोमूत्र, दही अशा पंचद्रव्यांपासून तयार केलेले दिवे पाहिले होते, पण त्यात आर्थिक लागत अधिक होती. त्यांनी आम्हाला सुरुवात तर करा, असे सांगितले. आम्ही सुरुवात केली. यात पती अ‍ॅड. नीलेश आंबिलवाडे, मुलगा आदर्श आणि मुलगी धनश्री तसेच कुटुंबातील इतर सदस्य राम नगरकर, श्याम नगरकर, प्रतीक्षा नगरकर यांचे सहकार्य मोठे होते.