निवडणूक आयोगाच्या नियमांना अधिकाऱ्यांकडून हरताळ; मतदार म्हणतात, पारदर्शक प्रक्रियेवरचा विश्वास उडतोय

विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी मतदान पार पडले. परंतु यादरम्यान अनेकांना ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत शंका आल्याने त्यांनी तशी तक्रार केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यासह निवडणूक आयोगाकडेही केली. परंतु लोकशाहीचा आधारस्तंभ, मतदार राजा वैगेरे विशेषणाने गौरवणाऱ्या या मतदारांच्या तक्रारींना मात्र थेट केराची टोपली दाखवली गेली. विशेष म्हणजे, काही केद्रांवर तर निवडणूक आयोगाच्या नियमांना अधिकाऱ्यांकडूनच हरताळ फासला गेला. त्यामुळे पारदर्शक प्रक्रियेचा दावा करणाऱ्या प्रशासनावरचा आमचा विश्वास उडतोय, अशा प्रतिक्रिया आता मददार व्यक्त करीत आहेत.

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील माऊंट कार्मेल शाळेच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रात गडबड असल्याचे सुज्ञ मतदाराच्या लक्षात आले. खामल्यातील तपोवन शाळेच्या केंद्रावर दोन मतदारांच्या नावाने भलत्याच कुणीतरी मतदान केले. मागील वर्षी मतदार राजाला यंत्रातील हा गोंधळ ठाऊक नव्हता, पण यावेळी मतदार जागरूक होता. असा प्रकार घडल्यावर काहींनी मतदानाला बगल दिली तर काहींनी थेट जिल्हाधिकारी ते निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. दक्षिण-पश्चिम मतदारसंघाअंतर्गतच दोन केंद्रांवर हा प्रकार घडला. अजनी परिसरातील माऊंट कार्मेल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या नियमांना संबंधित अधिकारी बगल देत होते. मतदार मतदान करत असताना ते कुणालाही पाहण्याचा अधिकार नाही. परंतु या केंद्रावर थेट अधिकारीच ते पाहात होता. केतकी अरबट यांनी या प्रकाराला हरकत घेतली. एवढेच नाही तर ईव्हीएम यंत्रातील लाल दिवा सतत सुरू होता. या केंद्रावर काँग्रेसला मतदान करणाऱ्या मतदाराच्या बाबतीत हा प्रकार घडत होता, पण त्याचवेळी भाजपला मतदान करणाऱ्या मतदाराच्या मतदानाची नोंद मात्र व्यवस्थित होत होती. या एकूणच आक्षेपार्ह प्रकारावर अरबट यांनी हरकत घेतली तर तेथे नियुक्त अधिकारी चक्क तुम्ही दुसऱ्या मतदाराचे मतदान बघा आणि नोंद होतआहे की नाही ते सांगा, असा सल्ला देत होता, असे अरबट यांनी सांगितले. एकीकडे लोकशाहीत गुप्तपणे मतदानाचा अधिकार मतदाराला असताना या अधिकाऱ्यांची ही वागणूक संताप आणणारी होती. म्हणूनच केतकी अरबट यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. परंतु २४ तासात त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, पण तिसऱ्या दिवशी आयोगाने दखल घेतली. अरबट यांना त्यांच्या नावासह सविस्तर माहिती मागितली. मात्र, गुरुवारी जाहीर होणाऱ्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर ४८ तासानंतर घेतलेली दखल सार्थकी लागण्याची सुतराम शक्यता नाही. याच मतदारसंघाअंतर्गत खामल्यातील तपोवन शाळेच्या मतदान केंद्रावर मधुकर देखमुख आणि अरविंद देशपांडे यांना केवळ घेरी येणेच बाकी राहिले होते. हे दोन्ही मतदार मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावाने भलत्याच कुणी मतदान केले होते. केंद्रप्रमुखाकडे त्यांनी तक्रार करत ओळखपत्र, मतदानपत्र दाखवले. तेव्हा कुठे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अर्ज भरून घेत(टेंडर वोट) मतदानाची प्रक्रिया पार पाडली. मात्र, त्यांच्या नावाने झालेल्या बोगस मतदानाचे काय, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. ईव्हीएम यंत्रावरील शंकांमुळे यावेळी मतदानाचा केवळ टक्का घसरला. हे असेच सुरू राहिले तर पुढच्या वेळी मतदानासाठी कुणीही घराबाहेर निघणार नाही. असे घडले तर लोकशाहीच धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया मतदार व्यक्त करीत आहेत.