लोकसत्ता टीम
बुलढाणा: बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील आणि मोताळा तालुक्यातील सधन शांतताप्रिय गाव म्हणून ओळख असलेले शेलापूर गाव, परिसर आज बुधवारी, ९ एप्रिलला अक्षरशः हादरला. शेलापूर गावातील एका माजी सैनिकाने आपल्या दोन बोअरच्या बंदुकीने दोनदा गोळीबार केला. अगदी क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे. यामुळे घटना स्थळी उपस्थित गावकऱ्यांची अक्षरशः पाचावर धरण बसली आणि धावपळ उडाली.
घटनेनंतर या पठ्ठ्याने घटना स्थळावरून पोबारा केला. मात्र बोराखेडी ( तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा) पोलिसांनी त्यांनी जीवावर उदार होत कसेबसे ताब्यात घेतले. त्याला बोराखेडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याचे बोराखेडी पोलिसांनी सांगितले. कारवाई सुरु असल्याने या गोळीबारचा विस्तृत तपशील येथे कळू शकला नाही. घटना स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( बुलढाणा) बि. बि. महामुनी, मलकापूर चे उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी भेटी देऊन घटना स्थळाची पाहणी केली. तसेच बोराखेडी पोलिसांना सूचना व निर्देश दिले.
येथे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शेलापुर येथे आज बुधवारी, ९ एप्रिल रोजी दुपारी ही खलबळजनक घटना घडली. २ बोअर च्या बंदुकीचा परवाना मिळालेल्या एकाचा शुल्लक कारणावरून संताप अनावर झाला.एवढा की त्याचा हात कंबरेला लटकवलेल्या बंदुकीवर गेला. रागाच्या भरात त्याने बंदूकीतून एक गोळी झाडली. शेलापुरातील एका हॉटेलवर शुल्लक कारणावरून राडा झाला. अनिल चिम (वय ५० वर्षे) हा त्याच्या साथीदारांसोबत हॉटेलवर बसलेला होता.
यावेळी ‘कोल्ड्रिंक बॉटल’ फेकण्यावरून वाद उद्भवला. वाद वाढत गेला तसा माजी सैनिक असलेल्या अनिल चिम याचा संताप अनावर झाला.त्याने थेट त्याच्या परवाना धारक बंदुकीतून दोन गोळ्या फायर केल्या. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटनास्थळ बुलडाणा मलकापूर रस्त्यावरच असल्याने काही वेळ एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी सैनिक असलेल्या आरोपी चिम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बोराखेडी पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याने यापूर्वी देखील अनेक कारनामे केल्याची चर्चा होत आहे.