पक्षी सप्ताहानिमित्त आयोजन, ५५ पक्षीप्रेमी सहभागी
नागपूर : हिंगणा वनपरिक्षेत्राअंतर्गत ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत वनमहर्षी मारुती चितमपल्ली व पद्मविभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत ११ नोव्हेंबरला सकाळी सात ते नऊ या कालावधीत पक्षी निरक्ष्ीाण आयोजित करण्यात आले. यात ५५ पक्षीप्रेमी सहभागी होते.
नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापासून अंबाझरी तलावावर विदेशी पक्षी भेट देतात. युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, चीन व तिबेट मार्गे एव्हरेस्ट शिखर सर करून मध्यभारतात येतात. काही काळ येथे वास्तव्य करून दक्षिण भारतात समुद्र किनाऱ्यापर्यंत स्थलांतरित होतात. यावर्षी चीनमध्ये होत असलेल्या अति बर्फवृष्टीमुळे या विदेशी पक्ष्यांनी चीनमधला मुक्काम मुदतीपूर्वीच हलवून भारताच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच हिवाळी स्थलांतरण होण्याची चिन्हे आहेत, असे पक्षी अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांनी सांगितले. गुरुवारच्या पक्षीनिरीक्षणात पर्पल हेरॉन, रुडीशेल डक, ग्रीन बी इटर, ड्रोंगो, लिटिल कारमोरंट, ग्रेटर कारमोरंट, नॉर्दन पिंटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, लिटिल ग्रेप, लेथर, व्हिसलिंग डक, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, ट्रायकलर मुनीया अशा विविध पक्ष्यांना बघण्याचा आनंद पक्षीप्रेमींनी घेतला. विशेष म्हणजे, यलो थ्रोटेड स्पॅरो ज्याला सलीम अली की चिडीया असे म्हणतात. या पक्ष्यांची जोडी देखील पक्षी निरीक्षकांना दिसली. पक्षी निरीक्षणात राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष कुंदन हाते, सृष्टी पर्यावरण मंडळाचे सदस्य व वन्यजीव अभ्यासक विनीत अरोरा, पक्षी अभ्यासक व्यंकटेश मुदिलयार, हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य सौरभ सुखदेवे यांनी युवा पक्षी निरीक्षकांना मार्गदर्शन केले. प्रादेशिक वनिवभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक एस.टी. काळे यांच्या मार्गदर्शनात हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे, वनक्षेत्र सहाय्यक एस. एफ. फुलझेले, वनरक्षक आरती भाकरे, रुषाली गडेकर व अंबाझरी जैवविविधता उद्यानातील सर्व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर यांनी विशेष सहभाग नोंदवला.