अकोला : मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बाटलीत टाकण्याचा गोरखधंदा अकोल्यातील औद्योगिक वसाहत परिसरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कृषी विभागाच्या छाप्यात उघड झाला आहे. मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बाटलीत टाकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट घातला जात होता. कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल २२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या ठिकाणावरून कीटकनाशकांचे नमुने घेण्यात आले. तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

खरीप हंगामाची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जून व जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पीक चांगले उगवले आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. दरम्यान, पिकावर विविध प्रकारची रोगराई येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. कीटकनाशके खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, अकोल्यातील औद्योगिक वसाहत परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार व्हि.जे. क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ठिकाणी उघडकीस आला. या ठिकाणी अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने कारवाई केली.

मुदतबाह्य कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात साठा होता. या साठ्याची विक्री करण्याच्या दृष्टिने नवीन पॅकिंग केलेल्या बाटल्यांमध्ये ते भरले जात असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूर वर्गाकडून मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून ती कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, असे नियमबाह्य प्रकार सुरू होते.

कीटकनाशके कायद्यांतर्गत कृषी विभागाने कारवाई करून मुदतबाह्य कीटकनाशकांचा २१ लाख ९५ हजार रुपयांचा साठा पथकाने जप्त केला आहे. कृषी विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून आठ कीटकनाशकांचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली.