प्राचार्य पदाच्या मुदतवाढीसाठी डॉ. संतोष ठाकरेंचा बनावट प्रस्ताव

प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या सेवेला २१ नोव्हेंबरला पाच वर्षे झाल्याने त्यांना प्राचार्य पदाचा पदभार सोडावा लागला.

विद्यापीठाकडून कारणे दाखवा नोटीस

नागपूर : लैंगिक शोषण व सहकारी प्राध्यापकांना  शिवीगाळीचा आरोप असलेले मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी आपल्या प्राचार्य पदाच्या मुदतवाढीसाठी बनावट प्रस्ताव तयार करून संत गाडगेबाबा अमरावती  विद्यापीठाकडे मंजुरीस्तव सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची अमरावती विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून संस्थाध्यक्ष आणि प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्या प्राचार्याना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या सेवेला २१ नोव्हेंबरला पाच वर्षे झाल्याने त्यांना प्राचार्य पदाचा पदभार सोडावा लागला. मात्र, श्री गाडगे महाराज शिक्षण संस्थेला अशा लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या प्राचार्याना पुन्हा मुदतवाढ द्ययची असल्याने त्यांनी तसा प्रस्ताव विद्यापीठाला दिला होता. विद्यापीठ कायद्यानुसार प्राचार्याची नियुक्ती करणे, त्यांना मुदतवाढ देणे हा सर्वाधिकार त्या शिक्षण संस्थेला असतो. यासाठी केवळ विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवून कार्यवाही पूर्ण करावी लागते. मात्र, प्राचार्य डॉ. ठाकरे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप असल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात विद्यापीठालाही रस नसल्याने त्यांनी यासाठी विलंब केला. विद्यापीठाने या प्रस्तावाची दखल न घेतल्यामुळे प्राचार्य ठाकरे यांना परस्पर प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची व प्राचार्य डॉ. भिसे यांची बनावट समिती तयार करून विद्यापीठाकडे मुदतवाढीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, विद्यापीठाने यासंदर्भात  संस्थेला कोणतेही निर्देश दिले नसताना वरील दोन्ही प्राचार्याना या बनावट प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करीत तात्काळ खुलासा मागितला आहे.  दुसरीकडे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करीत सदर बनावट प्रास्तावावर स्वाक्षरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे. प्राचार्य ठाकरे यांच्यावर भदवि ३५४अ, ३५४ड, ५०४,५०६ व इतर अर्जदारांचे कलम ५०४ व ५०६ अन्वये मूर्तिजापूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमी वर मुदतवाढीसाठीच्या बनावट प्रस्तावावर विद्यापीठ वर्तुळात सर्वाचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे,  दोन प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या प्राचार्यानी कुठलीही सहानिशा न करता निवड प्रक्रियेमध्ये बेकायदेशीररित्या सहभाग नोंदवणे व बेकायदेशीर निवड प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करणे त्यांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.

विद्यापीठाने संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची व प्राचार्य डॉ. भिसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या खुलाशानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

प्राचार्याच्या अशा वर्तनाने शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलीन होते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी लढा देणाऱ्या सर्व प्राध्यापकांचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे.

डॉ. मीनल ठाकरे, अध्यक्ष, अखिल भारतीय शैक्षिक महासंघ, प्रांत महिला संवर्ग.

अशी बनवली समिती

प्राचार्य ठाकरे यांच्यावरील आरोपांची अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे विद्यापीठाकडून प्राचार्य मुदतवाढीसाठी  एक्टर्नल पीर टीम न दिल्यामुळे स्वत:च प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची व प्राचार्य डॉ. भिसे यांची बनावट  टीम  गठित करून मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करून प्राचार्य डॉ. सिकची व प्राचार्य डॉ. भिसे यांच्या स्वाक्षरी घेऊन विद्यापीठाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Extension principal fake proposal santosh thackeray ysh

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?