अकोला : पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. या विभागात दलालांकडून काही नागरिकांना बनावट शिधापत्रिका दिल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. प्रत्यक्षात शासनाकडून दोन वर्षांपासून ऑफलाइन शिधापत्रिकांचे वाटप बंद असून ई- शिधापत्रिकांचे वितरण होत आहे. तरीही पुरवठा विभागातील दलालांकडून बनावट व अनधिकृत पत्रिका देत नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सर्रासपणे घडले. या प्रकारे बनावट शिधापत्रिका तयार करून देणाऱ्या दलालांवर व त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिली. यानिमित्ताने पुरवठा विभागातील दलालांचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाश होतात आला आहे.

पुरवठा विभागात प्रचंड भोंगळ कारभार सुरू आहे. येथील बहुतांश कामकाज दलालांमार्फत चालते, असा सर्वसामान्यांचा समज असतो. त्याला कारणही तसेच असून नागरिकांचे काम विभागात सहजासहजी होत नाही. कुठल्याही कामासाठी नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पैसे देऊन दलालांमार्फत काम करून घेण्याकडे कल असतो. मात्र, त्यातही आता सर्वसामान्यांची आर्थिक लूट व फसवणूक होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

काही नागरिकांना दलालांनी पुरवठा विभागाच्या शिक्क्यासह बनावट शिधापत्रिकांचे वाटप केले. दलालांमार्फत मिळालेल्या बनावट शिधापत्रिकांचा वापर कार्यालयात विविध कामकाजासाठी होत असताचा प्रकार देखील समोर आला. प्रत्यक्षात सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये मागील दोन वर्षापासून शासनाचे आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. ऑफलाइन शिधापत्रिका बंद झाल्या असून ई-शिधापत्रिकांचे वितरण केले जात आहे. तरी देखील शिधापत्रिका तयार करून देण्याच्या नावावर दलाल सर्वसामान्यांची हजारो रुपयांनी आर्थिक लूट करून बनावट शिधापत्रिकांद्वारे त्यांची फसवणूक करतात. या सर्व प्रकारापुढे पुरवठा विभाग देखील हतबल झाल्याचे चित्र आहे.

…तर संबंधितावर थेट फौजदारी गुन्हा

शिधापत्रिकांचे किंवा पुरवठा संबंधित कोणतेही कामकाज करून घेण्यासाठी कार्यालयात दलाल आढळून आल्यास संबंधितावर थेट फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल. दलालांकडून शिधापत्रिकांचे कोणतेही काम करून घेऊ नये, तसेच त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे देऊन स्वतःची फसवणुक होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिल्या. अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शिधापत्रिकांच्या विविध कामकाजासाठी तालुकानिहाय पुरवठा शाखेमध्ये नियुक्त असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशीच संपर्क करून आपले कामकाज पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.