नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात अटकसत्र सुरूच आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे खणण्यासाठी गठित विशेष तपास पथकाने बुधवारी रात्री आणखी एका मुख्याध्यापकाला गोंदिया जिल्ह्यातून अटक केली. तपास पथकाने अटक केलेला आरोपी संस्थेचा सचिव आणि एका शाळेचा मुख्याध्यापकही आहे. त्यामुळे या प्रकरणात विशेष तपासपथकाने आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या १५ वर पोहचली आहे. तर सायबर शाखेकडून ९ अशी एकूण अटकेतील आरोपी संख्या २४ झाली आहे.
धनराज हुकरे (५४) असे एसआयटीने गोंदिया जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. हुकरेला गुरुवारी न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने शनिवार (२६ जुलै)पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. हुकरेने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करीत दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचे तपास पथकाला आढळले आहे. या शिक्षण संस्थेकडून २ महाविद्यालये आणि १० शाळा चालवल्या जातात. धनराज हा यातल्या एका संस्थेचा सचिव आणि देवरी येथील शिवराम विद्यालयात धनराज हुकरेच्या वडिलांनी गोंदिया जिल्ह्यात भीमाबाई शिक्षण संस्था स्थापन केली होती. मुख्याध्यापक आहे. त्याने २ शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भातले प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवले होते. हे शिक्षक त्याच्या संस्थेत बनावट कागदपत्रद्वारे शालार्थ आयडी बनवून कार्यरत आहे, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली.
पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली, सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरडाले यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी एक पथक गोंदियाला रवाना झाले. सापळा रचून मुख्याध्यापक धनराज हुकरेला बुधवारी रात्री मरदोली गावातून अटक करीत नागपूरला आणण्यात आले. बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.
अटक आरोपी संख्या आतापर्यंत दोन डझनावर
या घोटाळ्याचा विशेष तपास पथकासह सायबर शाखाही समांतर तपास करीत आहे. या दोन्ही तपास संस्थांनी मिळून आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. त्यापैकी १५ जणांना एकट्या विशेष तपास पथकाने तर सायबर शाखेने ९ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या खेरीज यातल्या ११ जणांच्या विरोधात न्यायालयात प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अटक नरड, नाईक आणि वंजारी या तिघांना दोन्ही तपास सस्थांनी संयुक्तपणे अटक केली आहे. यातल्या सर्वांनी आपल्या अधिकाराच गैरवापर करीत बनावट शालार्थ ओळखपत्र तयार करून बनावट शिक्षकांच्या नियुक्त्या करीत शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.