गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा(माओवादी) सरचिटणीस तसेच नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याच्या कुटुंबीयांकडून त्याचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शनिवारी २५ मे रोजी यावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाल्याने मृतदेहासाठी छत्तीसगड पोलिसांकडे मागणी करा, असे सांगून या संदर्भातील दोन याचिका निकाली काढल्या.
२१ मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत थेट नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला. त्याच्यासोबत आणखी २६ नक्षल्यांना टिपण्यात पोलिसांना यश आले. नक्षलवाद्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा नेता चकमकीत ठार झाला आहे. दरम्यान, बसवराजूचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी धडपड चालवली आहे. एरवी पोलीस प्रशासन ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करतात. पण बसवराजूच्या प्रकरणात उशीर होत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करून मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. यावर शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर याचिकाकर्त्यांना मृतदेहासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडे जाण्याची सूचना केली. यावेळी छत्तीसगडचे महाधिवक्ता यांनीदेखील शनिवारपर्यंत शवविच्छेदन आणि तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगून लवकरच मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करणार असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही याचिका निकाली काढल्या.
अंत्ययात्रेच्या उत्सवी प्रथेमुळे पोलीस चिंतीत?
गडचिरोली, छत्तीसगडमध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शांततेत पार पडत असते. मात्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये मृत नक्षल नेत्यांची अंत्ययात्रा वाजत गाजत काढण्यात येते. यावेळी नक्षलवाद्यांची गाणी, घोषणा सुद्धा देण्यात येतात. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात. इतकेच नव्हे तर राजकीय नेते सुद्धा या अंत्ययात्रेत सहभागी होतात. एखाद्या उत्सवाप्रमाणे अंतिमसंस्कार करण्यात येतात.
गेल्याच महिन्यात एका महिला नक्षलवाद्याच्या अंत्ययात्रेचे छायाचित्र आणि चित्रफित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले होते. यात मोठ्या संख्येने एकत्र आलेले लोकं आणि राजकीय नेते स्पष्ट दिसत होते. बसवराजू हा नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता होता. त्यामुळे त्याच्या अंत्ययात्रेत देखील असेच काही होईल अशी शंका, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच प्रशासन मृतदेह देण्यास, विलंब करीत असल्याची चर्चा आहे.