धुळे – अकारण वाद घालून कोयत्याने वार करीत शेतातील १६ कोंबड्या आणि १८ हजार ५७० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या आरोपाखाली पाच जणांविरूद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी साक्री तालुक्यातील जामदे येथील रमेश भोसले दिलेल्या तक्रारीनुसार लोंगी पवार, शत्रुघ्न पवार, दादु पवार, शिवसिंग पवार, रयाजी पवार (सर्व रा.जामदे) यांनी संगनमत करून रमेश भोसले यांच्या घरात प्रवेश केला.

शिवीगाळ केली. शिवसिंगने कोयत्याने रमेश भोसले यांच्या कपाळावर वार केला. यात ते जखमी झाले. सर्व पाचही हल्लेखोरांनी भोसले यांच्या १६ पाळीव कोंबड्या आणि १८ हजार ५७० रुपये असा २१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.