एकाचवेळी दु:ख, राग, संताप, हळहळ अशा भावना मनात निर्माण व्हायला घडलेली घटनाही तशीच असावी लागते. आयुष्यात असे प्रसंग फार कमी वेळा येतात. जे या एकत्रित भावनांच्या कल्लोळाने मन सुन्न करून टाकतात. अनेकदा ही सुन्नता बधिर करणारी असते. त्या अवस्थेतून जरा सावरल्यावर मेंदू विचार करू लागतो तेव्हा अनेक प्रश्न जन्म घेतात. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न माणूस करू लागतो. अनेकदा ती मिळतातही पण वास्तव तसे नसते. ते आणखी छिन्नविच्छिन्न स्वरूपात आपल्यासमोर उभे ठाकलेले असते. यातून निराशा पदरी पडते व माणूस अनेकदा हतबल होऊन जातो. मनात एकाचवेळी अनेक भावना निर्माण करणारी घटना व त्यातून उभे राहणारे प्रश्न मग आयुष्यभरासाठी पाठलाग करत राहतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात हे घडते, तेही प्रामुख्याने अपघातात एखादा जवळचा व्यक्ती गमावल्यावर. अशा दुर्घटनेत अकाली जाणारी व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी असेल तर याच एकत्रित भावनांची व्याप्ती मोठी होत जाते. तसेच काहीसे अमिताभ पावडे या ‘लव्हेबल’ व्यक्तीच्या जाण्याने झालेले दिसले. त्यांच्या जाण्याने अनेक जण हळहळले. चांगला माणूस गेला अशा प्रतिक्रिया उमटल्या. केवळ पावडेच नाही तर अचानक ‘एक्झिट’ घेणाऱ्या अनेकांच्या बाबतीत असे होते. मात्र अनुभव असा की ही हळहळ कधीही प्रश्नांना भिडण्याचा निर्धार, त्यातून मिळणाऱ्या उत्तरापर्यंत जात नाही. ती व्यक्त करणारे काही दिवस यावर चर्चा करतात, मग सारे शांत होते. पुन्हा कुणाचा मृत्यू होईपर्यंत. तेव्हा उमटलेले प्रश्न तसेच थिजलेले राहतात. किमान या अपघातानंतर तरी असे प्रश्नांचे थिजलेपण राहू नये यावर समाज म्हणून आपण कधी विचार करणार की नाही? राज्याची उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या या शहरात वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहन चालवणाऱ्या एका प्रतिष्ठिताचा असा मृत्यू होतो ही या शहरासाठी लाजिरवाणी बाब नाही काय? हे असे घडण्याला केवळ व्यवस्थाच दोषी असेही कुणी म्हणणार नाही. तिचा दोष आहेच पण समाज म्हणून आपण नेमके कोणत्या दिशेने चाललो आहोत? ज्या बुलेटस्वाराच्या धडकेत पावडे ठार झाले त्याला वा त्याच्या घरच्यांना आपण मुलांना वाहतुकीचे नियम पाळायला शिकवले नाही अशी खंत कधीतरी वाटेल काय? अलीकडे तर मुलांनी बेदरकारपणे वाहन चालवणे हा कुटुंबात कुतूहलाचा व प्रतिष्ठेचा विषय असतो. मुलांना सोबत घेऊन वाहने चालवणारे पालकच सर्रास नियमांचे उल्लंघन करतात. अशी एक बेकायदा कृती कुणाचे तरी आयुष्य संपवू शकते याची जाणीवच समाजातून नाहीशी होत चाललेली. ही प्रगती म्हणायची की अधोगती?
पावडे आयुष्यभर नियम पाळत जगले. त्याची शिक्षा त्यांना मिळाली असे आता समजायचे काय? आता मुद्दा व्यवस्थेचा. यात सारेच आलेत. प्रशासन, पोलीस, व्यवसायकर्ते. या साऱ्यांनी एकत्र येऊन धंतोलीसारख्या सुखवस्तू भागाची पूर्णपणे वाट लावली त्याचे काय? एकेकाळी सधन लोकांची ही वस्ती आताही तशीच आहे पण त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा श्वास दिवसागणिक कोंडत चाललाय? कारण काय तर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला याच भागात रुग्णालय थाटायचे आहे. न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही या भागात रोज नवनवीन रुग्णालये सुरू होतच आहेत. अगदी नियम वाकवून. त्यात येणाऱ्या हजारो रुग्णांच्या गर्दीच्या व्यवस्थापनाचे काय असा प्रश्न कुणालाच पडत नाही. मिळेल तिथे वाहने उभी करा, वाहतूक शिपाई आला तर त्याला पैसे द्या, रस्ते जाम करा, पालिकेचे पथक आले तर त्यांना चिरीमिरी द्या, वाहने उचलून नेणारे पथक आले की थेट डॉक्टरला सांगा, ते ‘टोईंग’वाल्या मालकांना फोन करतील असले बेकायदा उद्योग या भागात दिवसभर सुरू असतात. किमान रात्री तरी हा त्रास होऊ नये म्हणून या भागात राहणारे लोक हातात काठ्या घेऊन गस्त करतात व इमारतीसमोर कुणी वाहन लावलेच तर त्याच्या काचा फोडतात. याला उपराजधानी म्हणायचे काय? लाच हाच व्यवस्था वाकवण्याचा प्रभावी उपाय हे सर्वांना ठाऊक असल्याने कुणीही नियम पाळायला तयार नाहीत. यातून तयार झालेल्या बजबजपुरीचा पावडे बळी ठरलेत. हे सत्य सर्वांना ठाऊक पण सारेच गप्प राहण्याला प्राधान्य देतात. हाच प्रकार जर या गप्प राहणाऱ्यांच्या घरात घडला तर काही काळ त्वेषाने बोलतात व पुन्हा परिस्थितीला शरण जातात. शहर नियोजनाचे वाटोळे झाले ते यामुळे. या नियोजनशून्यतेला प्रशासनातले जे लोक जबाबदार आहेत ते समाजच बिघडलाय, आम्ही तरी काय करणार असे ज्ञानाचे डोज पाजत स्वत:ची अकार्यक्षमता लपवत राहतात. ना कायद्याचा धाक, ना कुणी जबाबदार अशी अवस्था एकदा निर्माण झाली की अराजक माजते. नेमके त्याचेच दर्शन अलीकडे वारंवार होते.
पावडे पुरोगामी होते की प्रतिगामी, उजव्या विचाराचे की डाव्या हा प्रश्न नाहीच. प्रश्न आहे तो अशी समाजाला दिशा देणारी माणसे नाहक जाण्याचा. कोणत्याही शहराची ओळख ही त्यात असलेल्या पायाभूत सुविधांवरून जशी होते तशी ती त्या शहरात कोण राहतात यावरून सुद्धा! या अर्थाने विचार केला तर पावडे हे सर्वदूर ओळख असलेले या शहराचे सजग नागरिक होते. कोणत्याही शहराची शक्ती ही अशा नागरिकांवरून जोखली जाते. शेतीचे प्रश्न असो, शहर विकासाचे मुद्दे असो, कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन असो, त्यात आपला सहभाग असावा असे मनापासून वाटणारे ते एक होते. याशिवाय अलीकडे समाजातून दुर्मिळ होत चाललेला एक गुण त्यांच्यात होता. विचार अनुकूल असो वा प्रतिकूल. तो निमूटपणे ऐकून घेण्याची व सभ्यतेला धरून वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची शैली होती. त्यामुळे वर्तुळ उजव्याचे असो वा डाव्यांचे, पावडेंची उपस्थिती कधी कुणाला खटकली नाही. हे जे काही त्यांच्यात आले ते वारशाने. त्यांचे वडील गांधीवादी तर आई आंबेडकरवादी. त्याकाळी गाजलेल्या प्रेमविवाहातून एकत्र आलेल्या कुटुंबांचा वसा पावडेंनी समर्थपणे पेलला. त्यांच्या भल्यामोठ्या कुटुंबात सर्व जातीधर्माचे लोक आजही गुण्यागोविंदाने राहतात. गडगंज संपत्ती असूनही त्याचे प्रदर्शन न करता समाजाला उपयोग होईल अशा प्रत्येक उपक्रमात मदत करत राहणारे आजकाल विरळेच. या अर्थाने पावडे दुर्मिळातले दुर्मिळच म्हणायचे. अशी माणसे शहराच्या श्रीमंतीत भर टाकत असतात. दुर्दैव हे की समाज वा व्यवस्थेतील अनेकांना हे अलीकडे कळेनासे झालेय. यातील सर्वांचा दृष्टिकोन केवळ संकुचितच झालेला नाही तर ‘मी-माझा’ यापुरता सीमित झालेला. अशा स्थितीत पावडेंच्या जाण्याने अनेकांना प्रश्न पडत असले तरी त्यातून व्यवस्था सुधाराची अपेक्षा बाळगणे कठीण. तरीही व्यक्त होत राहायचे. शेवटी आपल्या हाती उरते काय तर व्यक्त होणेच. म्हणून हा प्रपंच!