बेंबळा प्रकल्प ३५ वर्षांपासून अपूर्ण; शेतकरी संतप्त

शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील बेंबळा सिंचन प्रकल्पाचा मुख्य कालावा, उपकालवा आणि वितरिकांचे कामे गेल्या ३५ वर्षांपासून पूर्णत्वास येऊ नसल्याने पाण्यासाठी शेतकऱ्यांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

जनमंच, वेद आणि लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिंचन शोध यात्रा काढण्यात आली. या शोध यात्रेत जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, उपाध्यक्ष अमिताभ पावडे, अणे स्मारक समितीचे अ‍ॅड. अविनाश काळे, जनमंच मनोहर रडके, यवतमाळ जिल्ह्य़ाचे अध्यक्ष डॉ. चेतन दरणे, प्रल्हाद खरासणे, किशोर गुल्हाणे, कृष्णराव दाभोळकर, विनोद बोरकुटे, अजय बोंद्रे, प्रदीप निनावे सहभागी झाले होते.

बेंबळा सिंचन प्रकल्पाचे काम ३५ पूर्वी सुरू झाले. परंतु आजही कालव्यांची अर्धवट कामे आणि उपकालव्यांमध्ये बाभळीचे झाडे उगवलेली आहे. बेंबळा नदी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्य़ातील बाभूळगाव तालुक्यात खडकसावंगा गावाजवळ बेंबळा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. मुख्य कालवा ११३ कि.मी. लांबीचा आहे. या धरणाच्या माध्यमातून ४७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाला २० जानेवारी १९८३ ला मंजुरी मिळाली होती.

रामतीर्थ शिवारातील उपकालावा दहा वर्षांपासून पूर्ण झाला नाही, असे शेतकरी संघटनेचे सुरेश आगलावे यांनी सांगितले. राळेगाव, गणेशनगरच्या उपकालाव्याचे अस्तरीकरण झाले नाही. दोन्ही बाजूला मुरूम आणि माती टाकून कालवा बांधण्यात आला. या कालव्यातून दाबाने सोडल्यास कालवा फुटून मोठे नुकसान होण्याची भीती आहे. शिवाय मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम देखील पूर्ण झालेले नाही. अशा कालव्यातून पाणी सोडल्यास जागोजागी पाणी मुरून शेवटच्या शेतकऱ्याला पाणी आवश्यक तेवढे पाणी मिळणार नाही, असे जनमंच उपाध्यक्ष अमिताभ पावडे म्हणाले. यासंदर्भात बोलताना विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता (कालवा) सुनील कोंडावार यांनी डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

विदर्भातील सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता अडकून पडल्याची अनेक उदारहरणे आहेत. सुप्रमा देण्याचे अधिकारी नाशिकच्या कार्यालयाकडे आहेत. याची बैठक प्रत्येक महिन्याला होणे आवश्यक आहे. समितीची शेवटची बैठक १७ जून २०१७ झाली. सुप्रमा देण्याचे अधिकारी विदर्भ सिंचन विकास मंडाळाचे कार्यकारी संचालकांना देण्यात यावे. कालवे, उपकालव्यांचे काम एवढे दिवस होऊ शकत नाही. ही अतिशय संतापजनक बाब आहे. याचा आम्ही निषेध करतो.’’

– प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष