वर्धा : शेतकरी नेते रोखठोक व सरकारी धोरणविरोधात भाष्य करण्यात अग्रेसर असतात. दिल्लीतील शेतकरी आंदोलन चांगलेच गाजले होते. त्याचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकेत यांनी केले होते. अखेर तीन कायदे परत घेतल्या गेले. हे आंदोलन केवळ तीन, चार प्रांतातील शेतकऱ्यांचे नव्हे तर संपूर्ण भारताचे व शेतकरी समर्थक विदेशातील भारतीयांचेही होते, असे टिकेत यांनी स्पष्ट करीत आंदोलनाशिवाय सुधारणा नाही, असे स्पष्ट केले.
विविध संघटनांतर्फे येथे शेतकरी न्याय हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून टिकेत बोलत होते. ते म्हणाले शेतकऱ्यांना शेतीतून हद्दपार करण्याचा डाव सूरू आहे. जमीन महाग पण शेतमाल स्वस्त, याचे कारणच ते आहे. मुंबईतील व्यापारी वर्ध्यात शेती घेतो. शहरातील डॉक्टर व अन्य मंडळी शेतात पैसे गुंतवत आहे. त्यांना शेती कशी परवडते, हे कोणी सांगत नाही. सरकार विविध कामांसाठी जमिनी अधिग्रहित करते. पण भाव हा २०१३ च्या कायद्यानुसार लागू करते. सौदा आज व भाव बारा वर्षांपूर्वीचा. हे हाणून पाडले पाहिजे.
बिहारमध्ये २० वर्षांपूर्वी मंडी ऍक्ट लागू झाला. आणि त्याची झळ शेतकऱ्यांना बसली. शेतकरी केवळ मजूर झाले. देशभर फिरू लागले. विरोध केला नाही तर महाराष्ट्राचा आगामी २० वर्षात बिहार होणार, मजुरांचा प्रांत. या नितीच्या विरोधात शांततेत आंदोलन उभारणे, हा एकमेव मार्ग आहे, असे टिकेत यांनी आवाहन केले.
गावातील शाळा बंद पडून सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप पण टिकेत यांनी केला. कारण मजूर हवेत. शेतकऱ्यांना हमी भावाची कायदेशीर खात्री अद्याप मिळालेली नाही. धार्मिक, भाषिक, जातीय, क्षेत्रीय वाद निर्माण केले जात आहे. तुम्ही आपसात लढत बसा. आमच्या किसान मोर्चात पण भेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. महाराष्ट्र ही लढवैय्यांची भूमी आहे. शांतीचा संदेश देणाऱ्या महात्माजींची भूमी आहे. पण आज शेतकरी आत्महत्याचा प्रदेश, अशी ओळख सांगितल्या जाते. म्हणून सतर्क व्हा, असेही टिकेत यांनी सूचित केले.
शेतकरी नेते विजय जावंधीया म्हणाले की शेतकरी संघटन मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही १९८० मध्ये शेतकरी आंदोलन सूरू केले होते. पण त्यावेळीपेक्षा शेतीची स्थिती आज भयंकर वाईट आहे. किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे व डॉ. अजित नवले, केरळ किसान मोर्चाचे विजू कृष्णन, सत्यशोधक किसानचे राजन क्षीरसागर, तसेच किशोर ढमाले, हरियाणाचे सुखविंदर सिंग, गुरमित सिंग, प्रत्युश श्रीवास्तव व अन्य शेतकरी नेते उपस्थित होते.