जगाचा पोशिंदा, अन्नदाता असा शेतकऱ्यांचा जाहीर भाषणातून उल्लेख करण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात अन्नदात्या शेतकऱ्यांवर अन्नत्याग करण्याची दुर्दैवी पाळी आली आहे. चिखली तालुक्यातील तीन गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सन २०२२ च्या खरीप हंगामातील पीक विम्याची मोबदला रक्कम देण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: सरपंच, उपसरपंचासह गावातील युवक बनले ‘गुरुजी’, संप मिटेपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवण्याचा संकल्प
चिखली तालुक्यातील एकलारा, जांभरून आणि तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांनी २०२२ मधील खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा काढला. सतत पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. त्याचा पीक विमा कंपनी आणि कृषी सहायक यांनी सर्व्हे सुद्धा केला. मात्र, प्रचंड नुकसानीच्या तुलनेत त्यांच्यासह गावातील शेकडो शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळाला. काही शेतकऱ्यांना तर पीक विमा रक्कम मिळालीच नाही. त्यामुळे संबंधित विमा कंपनीकडे चौकशी करून मोबदला देण्यात यावा, अशी आंदोनकर्त्यांची मागणी आहे. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरुच राहील, असा पावित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: वडिलांबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’, काँग्रेस जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यकर्त्याला मारहाण
या अन्नत्याग आंदोलनात सुनील आंभोरे, हर्षल आंभोरे, विनोद आंभोरे, शंकर बनकर, सागर आंभोरे, सुखदेव घेवंदे, मदन आंभोरे, शेनफड आंभोरे, भानदास मारके, श्रीकृष्ण हिंगे, सुनील मोरे, पांडुरंग झगरे, प्रल्हाद पवार, वासुदेव आंभोरे, दत्तात्रय तांगडे, गणेश आंभोरे, किसन आंभोरे, संगीता घेवंदे, अजय घेवंदे यांच्यासह एकलारा, जांभरून आणि तेल्हारा येथील शेतकरी सहभागी झाले आहे.