लोकसत्ता टीम

वर्धा : शेतमालाला योग्य भाव मिळावे, ही मागणी सातत्याने होते. अगदी २५ वर्षांपूर्वी शरद जोशी यांनी, “भिक नको, हवे घामाचे दाम” म्हणत रान पेटविले होते. आजही तेच दुःख असल्याची भावना आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून आली. कापूस घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेले भाव मिळत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकरी बंधूंनी उभा कापूस पेटवून दिला. प्रतिक्विंटल दहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. दुप्पट तर सोडाच पण लागवड खर्चही निघत नाही. चार वर्षापूर्वी जो भाव मिळत होता, तेवढाही आता मिळत नाही. त्या तुलनेत खते, किटनाशक याचे भाव गगनाला भिडले आहे. सोयाबीन सात हजार रुपये क्विंटल होते ते आता साडेचार हजार भावाने विकावे लागत आहे. केंद्राने राज्यांना जे हमी भाव पाठविले ते सुद्धा मिळू शकत नाही. मग दुप्पट हमीची शेखी कशी मिरविता, असा सवाल जगताप यांनी केला.

आणखी वाचा-अमरावती : दहा दुकानांमध्‍ये चोरी करून ‘ते’ पाहत होते सिनेमा; पोलिसांनी चित्रपटगृहातच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, तरच दोन पैसे पदरात पडतील. आज मिळणाऱ्या भावाने लागवड खर्चही निघत नाही. एकीकडे निसर्ग तर दुसरीकडे सरकार झोडपत आहे. हे लुटीचे धोरण बंद झाले पाहिजे. आज आम्ही आमचाच कापूस पेटवित आहे. जर धोरणात बदल झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलन झाल्यावर आर्वी उपविभागीय अधिकारी यांना पंतप्रधान मोदी यांच्या नावे मागणीचे निवेदन देण्यात आले.