लोकसत्ता टीम

वर्धा : दोन दिवसापूर्वी विदर्भातील सर्वाधिक तापमान वर्ध्यात नोंदविल्या गेले. उन्हाचा तडाखा आजही कायम असल्याने मनुष्य प्राणी त्या पासून सुरक्षित व्हावे म्हणून कुलर, एसी असे उपाय करून बसला आहे. शीत पेयांच्या दुकानात गर्दी उसळली आहे. तर दुसरीकडे वन्य प्राणी, भटकी जनावरे कसाबसा सावळीचा आश्रय शोधू लागले आहे.

मात्र काही वन्य प्राणी उन्हाळा एन्जॉय करीत असल्याचे दिसून आले आहे. जखमी, बेवारास अश्या या प्राण्यांसाठी हक्काचा निवारा म्हणून वर्धेलगत करुणाश्रम हे प्राणी अनाथालय कार्यरत झाले आहे. वेगवेगळ्या कारणास्तव आश्रयास आलेल्या प्राण्यांना या ठिकाणी मायेची सावली मिळत आहे. सध्या या ठिकाणी जग्गू हा बिबट, लाडक्या मुन्नासाह तीन अस्वल,दोन वर्षीय छाया व पुष्पा सह तीन हरीण, तीन काळविट, सहा माकडे, चार मोर तसेच अन्य काही पक्षी आहेत.

आणखी वाचा-वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू

जग्गूची विशेष काळजी म्हणून त्यास कुलरची थंड हवा मिळत आहे. त्यासह अन्य उपचार पण घेत आहे. अन्य प्राण्यांना डिझर्ट कुलर तसेच एका शेड मध्ये ठेवण्यात आले आहे. शेडवर हिरवा चारा अंथरला जातो. न्याहारीस फ्रिजर मधील थंड फळे, बर्फ गोळे व कोवळा चारा दिल्या जात आहे. करुणाश्रमचे संचालक आशिष गोस्वामी हे सांगतात की जग्गू हा बिबट बर्फ गोळे आवडीने खातो. एका डब्ब्यात पाणी व त्याच मासाचे तुकडे ठेवून ते फ्रिजर मध्ये ठेवल्या जातात. त्याचे मासमिश्रित गोळे तयार होतात. हे गोळे आवडीने खाल्ल्या जातात. काही फळांचे ठेले लावणारे टरबूज, डांगर दान म्हणून देतात. निर्मल बेकरीतून ब्रेड चे काप मिळतात.

उन्हाळ्यात आहार वाढतो. पण पदार्थ काहीही देऊन चालत नाही. त्यामुळे खास तजवीज करावी लागते. पावसाळ्याच्या सुरवातीस बरे झालेले प्राणी आम्ही वन विभागाच्या सहकार्याने जंगलात सोडून देत असतो, असे गोस्वामी सांगतात.