लोकसत्ता टीम

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या राज्यातील एकमेव ‘हत्तीकॅम्प’मध्ये होळीच्या दिवशी राणी नावाच्या मादा हत्तीने एका गोंडस पिलाला जन्म दिल्याने प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. नव्या पाहुणीच्या आगमनाने या ‘कॅम्प’मध्ये हत्तींची एकूण संख्या आता नऊ झाली आहे.

सर्वत्र होळीचा उत्साह सुरू असताना कमलापुर येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी हत्तीणीला सकाळपासूनच प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कमलापूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लगबग लागली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश येमसे यांनी राणीची प्रसूती सुरक्षितरित्या केली.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी हत्ती कॅम्पला भेट देऊन पाहणी केली तसेच नवीन मादी पाहुणीची योग्य काळजी घेण्याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके उपस्थित होते. नव्या पाहुणीच्या आगमनाची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली. हत्तीकॅम्पमध्ये सद्या राणी, रुपा, प्रियंका, मंगला, बसंती, गणेश, अजित, लक्ष्मी आदी हत्ती आहेत. रविवारी नव्या मादी पाहुणीचे आगमन झाल्याने आता एकूण हत्तींची संख्या नऊ झाली आहे. नव्या पाहुणीचे नामकरण काही दिवसातच होणार आहे.

अंबानींच्या प्राणी संग्रहालयात येथील हत्ती नेण्यावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून या हत्तीकॅम्पला राज्यातच नव्हे देशात नवी ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.