समाजकंटकांपासून सुरक्षेसाठी महामंडळाचा निर्णय

महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बसमधील दिवे बंद न करण्याच्या सूचना एसटीच्या चालक- वाहकांना दिल्या आहेत. याबाबतचे निर्देश विभाग नियंत्रक कार्यालयांना मिळाले आहेत.

अनेक महिला रात्री एकटय़ा प्रवास करतात. काहीवेळा त्यांना काही समाजकंटक पुरुषाकडून त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश सर्व विभाग नियंत्रक कार्यालयात सोमवारी मिळाला. या कार्यालयाकडून सर्व चालक-वाहकांना तातडीने ही सूचना पोहोचवून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६,५०० बसगाडय़ा असून यामध्ये साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या बसचा समावेश आहे. 

कालमर्यादा संपल्याने दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यातून शेकडो बसगाडय़ा  भंगारात काढल्या जातात. परंतु हल्ली निधीचा अभाव आणि करोना संकटामुळे ताफ्यात नवीन बस दाखल करता आल्या नव्हत्या. परंतु नुकताच नवीन साध्या प्रकारातील बस घेण्याचा निर्णय झाला असून यात ७०० स्वमालकीच्या आणि ५०० भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा एसटीला मिळणार आहेत.

एसटी बसचा प्रवास सर्वात सुरक्षित आहे.  याच क्रमात महामंडळाकडून आलेल्या आदेशानुसार एखादी महिला रात्री प्रवास करीत असेल व तिने बसचा दिवा बंद न करण्याची सूचना केल्यास दिवे सुरूच राहतील.’’

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक (नागपूर), एसटी महामंडळ