scorecardresearch

इडली, सांबार वडा, उत्तपम…तामिळनाडूकरांची १५ दुचाकी उपाहारगृहे भागवतात नागपूरकरांची भूक!

हे विक्रेते ‘अण्णा’ या नावाने ग्राहकांमध्ये ओळखले जातात. ते फोनद्वारे ग्राहकांना पदार्थ उपलब्ध करून देतात.

इडली, सांबार वडा, उत्तपम…तामिळनाडूकरांची १५ दुचाकी उपाहारगृहे भागवतात नागपूरकरांची भूक!
इडली, सांबार वडा, उत्तपम…तामिळनाडूकरांची १५ दुचाकी उपाहारगृहे भागवतात नागपूरकरांची भूक!

नागपूर : तामिळनाडूतून नागपुरात आलेल्या सुमारे १५ जणांनी दुचाकीवर दक्षिण भारतीय पदार्थांचे फिरते उपाहारगृह सुरू केले असून रोज शेकडो नागपूरकर तेथील इडली, सांबार वडा व उत्तपमचा आस्वाद घेत आहेत. या स्वादाची सगळ्यांना भुरळ पडली आहे.दाक्षिणात्य पदार्थ महाराष्ट्रातील लोकांना आवडत असल्याचे लक्षात आल्यावर रोजगाराच्या शोधात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी नागपुरात आलेल्या तामिळनाडूतील १५ जणांनी या पदार्थ विक्रीलाच उदरनिर्वाहाचे साधन केले. प्रथम सायकलवर लाकडी पेटीत इडली, सांबार वडा, उत्तपम ठेवून त्याची विक्री करीत असत.

लोकांकडून मागणी वाढल्यावर सर्वांनी दुचाकी वाहनाला विशेष स्टॅन्ड लावून विक्री सुरू केली. हे विक्रेते ‘अण्णा’ या नावाने ग्राहकांमध्ये ओळखले जातात. ते फोनद्वारे ग्राहकांना पदार्थ उपलब्ध करून देतात. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थ खाण्याची इच्छा झाली की घरपोच सेवा देण्याची त्यांची तयारी असते. एकूणच त्यांच्या दुचाकीवरील उपाहारगृहांनी चांगलाच जम बसवला असून अनेक जण सकाळचा नाष्टा हा त्यांच्याकडूनच करतात. यावरून या पदार्थाच्या मागणीची कल्पना येते.नागपुरातील धरमपेठ कॅनल रोडवर सुरेश अण्णा हे रोज त्यांच्या दुचाकीवर येऊन विक्री करतात. येथे येण्यापूर्वी ते धरमपेठ, शंकरनगरच्या काही ग्राहकांना गरजेनुसार पदार्थ उपलब्ध करून देतात.त्यानंतर सकाळी १० वाजता आपल्या मूळ ठिकाणी पोहचतात. फक्त ३० रुपये प्रतिप्लेट इडली सांबार (चार इडल्या), याच किंमतीत सांबार वडा (दोन वडे) आणि उत्तपम मिळते. कमी दर आणि स्वच्छतेवर भर यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची नेहमीच गर्दी असते.

हेही वाचा : प्रेयसीने लग्नानंतर प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार , मग घडले असे काही की…

लोकसत्ताशी बोलताना सुरेश अण्णा म्हणाले, तामिळनाडूतील छोट्या गावातून रोजगारासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी नागपुरात आलो.येथे प्रथम सायकल व आता दुचाकीवर खाद्यपदार्थांची विक्री करतो. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पदार्थ तयार करण्यासाठी संपूर्ण कुटुंबच मदत करते. नागपुरातील इतर भागात तसेच ग्रामीण भागात सुमारे १५ जण अशाच प्रकारचे फिरते उपाहारगृह चालवतात. सुरेश अण्णा यांच्याकडील सांबार आणि नारळाची चटणी ग्राहकांचे विशेष आकर्षण आहे. हवी तेवढी चटणी व सांबार ते ग्राहकांना पदार्थासोबत देतात. त्यासाठी अतिरिक्त पैसे घेत नाहीत. यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी असते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या