बुलढाणा : बहुप्रतीक्षित आणि लवकरच होऊ घातलेल्या बुलढाणा जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्याच्या निवडणुकीचा महत्वाचा पूर्व तयारी टप्पा आज (२२ ऑगस्ट) पार पडला.
ग्रामीण भागातील सर्वात मोठी निवडणूक असलेल्या या निवडणुकाची आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. पोळयाच्या शुभ मुहूर्तावर बुलढाणा जिल्हापरिषदेच्या ६१ तर १३ पंचायत समित्या१२२ प्रभागाची अंतिम रचना आज जाहीर करण्यात आली. यामुळे आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील राजकीय हालचालीना आज पासून वेग आला आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार बुलडाणा जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक -२०२५ अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेचा एक मतदार संघ ( गट) वाढला आहे. यामुळे आता बुलढाणा जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ (प्रभाग ) राहणार आहे. दुसरीकडे बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मोताळा, मलकापूर, नांदुरा, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या १३ पंचायत समित्यांचे १२२ मतदार गण (प्रभाग) राहणार आहे.
सदर अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट ८ (अ) व परिशिष्ट ८ (ब) या स्वरूपात तयार करण्यात आली आहे. या प्रभाग रचना आज शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समिती व १३ तहसिल कार्यालयांचे सूचना फलक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
या अंतिम प्रभाग रचनेच्या प्रकाशनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया पुढे वेगाने गतीमान होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व मतदारांना प्रभाग रचनेबाबत सुस्पष्ट माहिती मिळणार आहे.
ऐन पावसाळ्यात वातावरण तापणार
दरण्म्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापणार आहे. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांच्या हालचाली, संभाव्य उमेदवारीसाठी लॉबीन्ग, कार्यकर्त्यान्ची जुळवा जुळव, बैठका, जिल्हा स्तरीय नेत्यांच्या भेटीगाठी याला वेग येणार आहे. आज नेमका पोळा सण आल्याने आजच्या मुहूर्तावर अनेक इच्छुकांनी संपर्क अभियान सुरु केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी ( अजितदादा व शरद पवार गट ), शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट ) भाजपा या मुख्य पक्षांच्या बैठका , चर्चा यांना सुरुवात होणार हे उघड आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या लवकरच बैठका होणार आहे.