लोकसत्ता टीम

नागपूर: उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात शुक्रवारी दिवसाढवळ्या एका तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. कामगार नगर चौकातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या तक्रारीवरून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे कामगार नगर येथील सम्राट अशोक चौकात कारमध्ये आलेल्या ५ ते ६ गुन्हेगारांनी येथे उभ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सोनू नावाच्या तरुणावर गोळी झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा- हवाई दल प्रमुखांची नागपूरला भेट, देशभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा

सोनू शुक्रवारी पहाटे त्याचा मित्र शेख अमजदसोबत मोमीनपुरा संकुलात गेला होता. सोनूचा अवैध व्यवसायाशी संबंध आहे. या व्यवसायानिमित्तच त्याची आरोपी सदाफशी ओळख झाली. आरोपी सदफने सोनूला परिसरात व्यवसाय करण्यापासून रोखण्याची धमकी दिली होती. मात्र, किरकोळ बाचाबाचीनंतर धोका ओळखून सोनू मित्रासोबत दुचाकीवरून घरी परतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सदफ त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांसह एका कारमध्ये बसून सम्राट अशोक चौकात पोहोचला. सोनूला चौकात बसलेले पाहून सदफने रिव्हॉल्व्हर काढून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, लक्ष्य चुकले. सोनूने घटनास्थळावरून पळ काढला. त्याचवेळी आरोपीने त्याचा साथीदार शेख अमजद याला पकडून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, सोनू काही वेळाने घटनास्थळी परतला आणि गंभीर जखमी शेख अमजदला पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सोनू आणि त्याच्या मित्राला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. सदफचा संबंध इप्पा टोळीशी असल्याचे कळते. या घटनेनंतर पोलिसांची वेगवेगळी पथके गुन्हेगारांचा शहरातील शोध घेत आहेत.