नागपूर : वेडेवाकडे हातपाय घेऊन जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण विदर्भात जास्त आहे. त्यांच्यावर नि:शुल्क उपचारासाठी नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पहिले क्लबफूट क्लिनिक सुरू केले आहे. त्यासाठी अनुष्का फाऊंडेशनसोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे.

‘एम्स’मधील क्लबफूट क्लिनिकच्या सामंजस्य करारावर येथील कार्यकारी संचालक प्रा. डॉ. हनुमंत राव यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी एम्सच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. समीर द्विदमुठे, प्रकल्प व्यवस्थापक आशीष भदोरिया, पारस काळे, पाटील आदी उपस्थित होते. हे क्लिनिक प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

हेही वाचा – वर्धा : मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार; म्हणतात, “आमचे काम नव्हे,” प्रशासन पेचात…

हेही वाचा – आता ओबीसीही मुंबईत धडकणार, ७ फेब्रुवारीला मोर्चा कशासाठी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लबफूट ही जन्मतःच पायाची विकृती आहे. त्यात जन्मजात बालकाचे हातपाय वेडेवाकडे राहतात. ९५ टक्के रुग्णांना सातत्याने प्लास्टर आणि स्पिंट लावून उपचार होऊ शकतात. परंतु त्यासाठी खूप खर्च येतो. पालक हा खर्च उचलण्यास समर्थ नसल्यास ते मध्येच उपचार सोडतात. ५ टक्के रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रियेचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत असला तरी प्लास्टर व स्पिंटचा समावेश त्यात नाही. त्यामुळे अशा रुग्णांना आता या क्लिनिकचा लाभ होणार आहे. सामंजस्य करारानुसार, अनुष्का फाऊंडेशन हा प्लास्टर आणि स्पिंटचा खर्च उचलणार आहे. अनुष्का फाऊंडेशनकडून देशातील सुमारे १२ राज्यांमध्ये क्लबफूट क्लिनिकमध्ये काम सुरू असून विदर्भातील एम्स हे पहिले शासकीय रुग्णालय असणार आहे.