लोकसत्ता टीम
गडचिरोली: आरमोरी येथील एका डॉक्टर दाम्पत्याला धमकावून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका कथित पत्रकारासह पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपी एका ‘युट्यूब चॅनलमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे.
आरमोरी येथील डॉ. सोनाली धात्रक यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खाजगी रुग्णालयात जाऊन खंडणीची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी डॉ. धात्रक यांच्या घरी शिरून बळजबरीने पर्समधील एक लाख रुपये काढून घेतले. त्यांनतर फोन करून पाच लाखांची मागणी करत परिणाम भोगण्याची धमकी दिली.
आणखी वाचा-एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार; मुंबईला ११ सप्टेंबरपासून आंदोलन
याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून १२ तासांच्या आत नागपुरातून आरोपींना जेरबंद केले. यात कथित पत्रकार अमित वांढरे, दिनेश कुंभारे, विनय देशभ्रतार, रोशन बारमासे आणि सुनील बोरकर याचा समावेश आहे.
सर्व आरोपींवर दरोडा व खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहे.